"बदला फिक्स, आता मुडदे मोजा", आंदेकर टोळीकडून पुन्हा गँगवॉरची चिथावणी, 5 जणांना उचललं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील आंदेकर टोळीच्या काही समर्थकांनी पुन्हा एकदा बदला घेण्याची भाषा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवत ही धमकी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यात टोळीयुद्धाची मालिका सुरू आहे. गेल्यावर्षी माजी नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली होती. यावर्षी या हत्येचा बदला घेण्यात आला. आंदेकर टोळीने वनराज खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला टार्गेट बनवलं. त्याची गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आता आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, आयुष कोमकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कृष्णा आंदेकरसह एकूण १३ जणांना अटक केली आहे. सर्वजण सध्या तुरुंगात आहेत.
advertisement
असं असताना अजूनही आंदेकर टोळीची गुंडगिरी सुरूच आहे. या टोळीकडून उघडपणे एकमेकांना ठार करण्याची धमकी दिली जात आहे. आंदेकर टोळीच्या काही समर्थकांनी पुन्हा एकदा बदला घेण्याची भाषा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवत ही धमकी दिली आहे. "बदला तो फिक्स, रिप्लाय होगा, आता फक्त बॉडी मोजा" अशा प्रकारचं स्टेटस टाकून आंदेकर टोळीने पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीच्या पाच समर्थकांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची त्याच परिसरातून धिंड काढली. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांना खरमरीत संदेश दिला. मंथन भालेराव, फैजान शेख, पीयूष बीडकर, अथर्व नलावडे आणि ओंकार मेरगू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (२) (दहशत निर्माण करणारी विधाने करणे), १२५ (इतरांचे आयुष्य किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणण्याची कृती करणे) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
याशिवाय आंदेकर टोळीच्या आशीर्वादाने बेकायदा उभारलेली बांधकामे, परिसरातील अनधिकृत फ्लेक्स, कमानींवर अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याशिवाय चार वेगवेगळे गुन्हेदेखील नोंदवले गेले आहेत. मात्र, आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ आरोपींनी रील्स, स्टेटस अपलोड करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण सुरूच ठेवल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक करून परिसरातून त्यांची धिंड काढली.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 06, 2025 12:28 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
"बदला फिक्स, आता मुडदे मोजा", आंदेकर टोळीकडून पुन्हा गँगवॉरची चिथावणी, 5 जणांना उचललं