Pune Crime: 18 वर्षाच्या मुलाचं अपहरण; पोलीस समोर दिसताच अपहरणकर्त्यांनी उसाच्या शेतात घातली कार अन् भलतंच घडलं, पुण्यातील थरार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर अपहरणकर्त्यांनी कार पिसुर्टीच्या दिशेने अरुंद रस्त्यावर घातली. वेगाच्या नादात कार थेट उसाच्या शेतात शिरली आणि चिखलात रुतली.
पुणे : पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसरात मंगळवारी दुपारी एका १८ वर्षीय युवकाच्या अपहरणाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. एका नामांकित व्यापाऱ्याच्या मुलाला भरदिवसा 'XUV 700' कारमधून पळवून नेण्यात आले. मात्र, जेजुरी आणि नीरा पोलिसांनी दाखवलेल्या चित्तथरारक तत्परतेमुळे अवघ्या काही तासांतच या युवकाची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे.
भररस्त्यात 'XUV' मधून पळवले
दुपारच्या सुमारास पृथ्वीराज लखन दळवी या तरुणाला काळ्या रंगाच्या एक्सयूव्ही ७०० (MH 12 XE 5353) कारमधून जबरदस्तीने बसवून नेण्यात आले. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि 'ग्राम सुरक्षा यंत्रणे'द्वारे हा मेसेज वाऱ्यासारखा पसरला. पुणे ग्रामीण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संपूर्ण परिसरात 'सर्जिकल' नाकाबंदी लागू केली.
उसाच्या शेतात रंगला पाठलागाचा थरार
जेऊर-नीरा मार्गावर नाकाबंदी असताना पोलिसांना संशयित कार दिसली. पोलिसांनी इशारा देऊनही चालकाने कारचा वेग वाढवला. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर अपहरणकर्त्यांनी कार पिसुर्टीच्या दिशेने अरुंद रस्त्यावर घातली. वेगाच्या नादात कार थेट उसाच्या शेतात शिरली आणि चिखलात रुतली. पोलिसांनी कारला घेराव घातल्याचे पाहताच आरोपींनी दाट उसात उड्या मारून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ कारची झडती घेऊन पृथ्वीराजची सुरक्षित सुटका केली.
advertisement
नीरा आऊटपोस्टचे पीएसआय रविराज कोकरे, हरिश्चंद्र करे आणि प्रसाद कोळेकर यांनी केवळ नाकाबंदीवर न थांबता ५ किमी पुढे जाऊन रस्ता रोखला. त्यांच्या या धाडसामुळेच अपहरणकर्ते मुख्य रस्त्यावरून भरकटले. सध्या आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. हे अपहरण खंडणीसाठी होते की जुन्या वैयक्तिक वैरातून, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या पृथ्वीराज सुखरूप असून त्याच्या सुटकेनंतर कापूरहोळ परिसरात पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 7:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: 18 वर्षाच्या मुलाचं अपहरण; पोलीस समोर दिसताच अपहरणकर्त्यांनी उसाच्या शेतात घातली कार अन् भलतंच घडलं, पुण्यातील थरार









