संघर्षात हार मानेल ती नंदिनी कसली? घरातील कर्ते पुरुष अकाली गेले अन्.., Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पतीचं आणि सासऱ्याचं अकाली निधन झाल्यावर नंदिनी बागूल यांनी घरची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: पतीच्या अकाली निधनानंतर महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मात्र, या संघर्षाच्या काळातही महिलाच सक्षमपणे उभ्या राहतात आणि कुटुंबाचा डोलाराही सांभाळतात. असंच काहीसं उदाहरण पुण्यात आहे. 10 वर्षांपूर्वी पतीचं निधन झालं. त्यानंतर कोरोनात सासरे गेले. घरातील कर्त्या पुरुषांच्या अकाली निधनानंतर कुटुंब उघड्यावर येण्याची स्थिती होती. पण या दु:खातून स्वत:ला सावरत नंदिनी महेश बागूल पुढे सरसावल्या आणि त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. सासऱ्यांची पिठाची गिरणी चालवून त्या सासू आणि दोन मुलांचा सांभाळ करत आहेत.
advertisement
कुटुंबावर संकटांचा डोंगर
नंदिनी बागूल यांचे पती महेश यांचं 10 वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झालं. तेव्हा सासू-सासऱ्यांनी त्यांना अगदी मुलीसारखं जपलं. नंदिनी यांच्या सासऱ्यांचा गिरणी चालण्याचा व्यवसाय होता. पण कोरोनामध्ये सासऱ्याचंही निधन झालं. तेव्हा मात्र नंदिनी पूर्णपणे कोलमडल्या. दोन मुलं, सासूबाई आणि एकंदरीत सर्वच घराची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली.
advertisement
नंदिनी यांनी घेतली जबाबादारी
नंदिनी यांनी कुटुंबासाठी पदर खोचला अन् सासऱ्यांचा गिरणीचा व्यवसाय तसाच पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. तेही न लाजता. कारण घरगुती गिरणी चालवणं तितकसं अवघड नाही. पण मोठी गिरणी चालवण्याच्या व्यवसायात एकटीनं उतरणं म्हणजे महिलांसाठी थोडं अवघडच होतं. घर, संसार हेच आपलं जग माणणाऱ्या महिलांसाठी तर हे नक्कीच अवघड होतं. पण नंदिनी यांनी मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, सासूबाईंसाठी आणि घरासाठी जिद्दीनं या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. आज गेल्या तीन वर्षांपासून त्या एकट्याच हा व्यवसाय सांभाळतायेत.
advertisement
अन् जिद्दीनं उभा राहिले
"मी बाहेरचं जग कधीच पाहिलं नव्हतं. गिरणीच्या व्यवसायात पुर्णपणे उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीला भिती वाटली. पण नंतर मुलांच्या, घराच्या जबाबदाऱ्या आठवल्या आणि जिद्दीनं उभी राहिले. दु:ख कोणालाचं चुकलेलं नाही. पण त्यातच आपलं आयुष्य न घालवता ताकदीनं उभं राहता आलं पाहिजे. त्यामुळे मी महिलांना नक्कीच सांगेल की तुम्ही तेवढ्या सक्षम नक्कीच व्हा. छोट्या गोष्टीपासून किंवा व्यवसायापासून सुरु करा. पुढे यश नक्कीच मिळेल. पण खचून जाऊ नका," अशा शब्दांत नंदिनी इतर महिलांनाही बळ देतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 29, 2024 8:11 PM IST