एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय राष्ट्रीय खेळाडूला संपवलं, पुणे शहराला हादरवणारी घटना, आरोपीला...
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Pune Crime: पुण्यात एका 15 वर्षीय राष्ट्रीय कबड्डी खेळाडूला एकतर्फी प्रेमातून संपवण्यात आलं. पुण्याला हादरवणाऱ्या या घटनेत 4 वर्षानंतर न्यायालयाने आरोपीला जन्मठेप ठोठावली.
पुणे : 12 ऑक्टोबर 2021 रोजी बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे पुणे शहराला हादरवणारी घटना घडली होती. 15 वर्षीय राष्ट्रीय कबड्डी खेळाडूची एकतर्फी प्रेमातून निघृण हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात आरोपी शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मंगळवारी हा निकाल दिला. या घटनेनंतर तब्बल चार वर्षांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे.
शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत याने 12 ऑक्टोबर 2021 रोजी एकतर्फी प्रेमातून राष्ट्रीय कबड्डी खेळाडूवर हल्ला केला. चाकू व कोयत्याच्या 22 वारांमुळे तिचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले होते. आता 4 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड. हेमंत झंजाड यांनी काम पाहिले. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर व अमानुष स्वरूपाचा असल्याने त्याला मृत्युदंड देण्यात यावा, अशी मागणी सरकारी पक्षाने केली होती. आरोपीविरोधात साक्षीदारांच्या साक्षी, शवविच्छेदन अहवाल तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील विविध निकालांचा आधार न्यायालयासमोर मांडण्यात आला.
advertisement
मृत्यूदंड नाहीच
शवविच्छेदन अहवालानुसार मृत मुलीच्या शरीरावर तब्बल 25 छेदलेल्या जखमा आढळून आल्या होत्या. न्यायालयाने भारतीय दंड विधानाच्या कलम 302 अंतर्गत आरोपी दोषी ठरवला. या कलमानुसार मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा अशा दोनच शिक्षा आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने नमूद केले की, जन्मठेप ही नियमाची शिक्षा असून मृत्युदंड हा अपवादात्मक आहे.
advertisement
हा गुन्हा अत्यंत क्रूर असला तरी तो दुर्मिळातील दुर्मीळ या श्रेणीत मोडतो असे म्हणणे कठीण असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे आरोपीला मृत्युदंड देणे योग्य ठरणार नाही, असे मत व्यक्त करत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालावर प्रतिक्रिया देताना अॅड. हेमंत झंजाड म्हणाले, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. या निर्णयामुळे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. महिलांना कायद्याचा मजबूत आधार आहे, हे या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
advertisement
या निकालामुळे एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कठोर संदेश गेला असून, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी समाजानेही जबाबदारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 10:55 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय राष्ट्रीय खेळाडूला संपवलं, पुणे शहराला हादरवणारी घटना, आरोपीला...










