Panshet Dam: मासे पकडायला जाळं टाकलं पण रघुसोबतच भयंकर घडलं; काही क्षणात गेला जीव, पानशेतमध्ये धक्कादायक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
धरणाच्या काठावर असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला बाहेर पडता आले नाही, परिणामी बुडून त्याचा मृत्यू झाला.
पुणे : शिवजयंतीचा उत्सव सुरू असतानाच पुण्याच्या राजगड तालुक्यातील माणगाव येथून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचा पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रघुनाथ मोतीराम जगताप असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ हा गुरुवारी मासे पकडण्यासाठी पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेला होता. धरणाच्या काठावर असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याला बाहेर पडता आले नाही, परिणामी बुडून त्याचा मृत्यू झाला.
वेल्हे पोलिसांची तत्परता
घटनेची माहिती मिळताच राजगडच्या वेल्हे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने अथक शोधमोहीम राबवून रघुनाथचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
advertisement
शिवजयंतीच्या दिवशीच एका तरुण मुलाचा असा अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेल्हे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
2 तरुणांचा अपघातात मृत्यू
आज संपूर्ण महाराष्ट्र तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करत असताना, मावळ तालुक्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या लाडक्या राजाची शिवज्योत विसापूर किल्ल्यावरून मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात घेऊन गावाकडे निघालेल्या दोन तरुण शिवभक्तांवर काळाने झडप घातली. भरधाव कारने दिलेल्या भीषण धडकेत या दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण मावळात शोककळा पसरली आहे. मयत तरुणांची नावे ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे अशी आहेत. हे दोघेही शिवभक्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन स्वतःच्या गावी, म्हणजे शिंदेवाडीला पायी निघाले होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 12:38 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Panshet Dam: मासे पकडायला जाळं टाकलं पण रघुसोबतच भयंकर घडलं; काही क्षणात गेला जीव, पानशेतमध्ये धक्कादायक घटना









