पुणेकरांनो, बसमध्ये कोणाचा धक्का लागला तर सावध व्हा! पीएमपीमध्येच व्यक्तीसोबत मोठं कांड, पोलिसात धाव
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
२६ फेब्रुवारी रोजी दुपारी ते विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बसने प्रवास करत होते. बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने चोरट्यांनी त्याचा फायदा घेतला.
पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएमएल (PMPML) बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी परिसरात घडली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे विश्रांतवाडीतील धानोरी भागात वास्तव्यास आहेत. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ते विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बसने प्रवास करत होते. बसमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने चोरट्यांनी त्याचा फायदा घेतला. बस चालू असताना दोन चोरट्यांनी जाणीवपूर्वक ज्येष्ठ नागरिकाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. प्रवासादरम्यान त्यांना धक्का लागल्याचे भासवून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने त्यांच्या खिशातील ५० हजारांची रोकड काढून घेतली.
advertisement
चोरटे बस थांब्यावर झाले पसार
ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात येण्यापूर्वीच, बस शांतीनगर येथील थांब्यावर आली असता चोरटे घाईघाईने बसमधून उतरले आणि गर्दीचा फायदा घेत पसार झाले. आपली रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित ज्येष्ठ नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. पोलीस हवालदार भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सार्वजनिक वाहनात प्रवास करताना नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 1:46 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो, बसमध्ये कोणाचा धक्का लागला तर सावध व्हा! पीएमपीमध्येच व्यक्तीसोबत मोठं कांड, पोलिसात धाव










