हृदयद्रावक! पत्नी अन् मुलं वाटच बघत राहिले; घरी जाताना वाटेतच पुण्यातील पोलिसाचा धक्कादायक शेवट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
चाकणमधील महाळुंगे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शशिकांत श्रीधर होले (वय ३७, रा. होलेवाडी) यांचा शनिवारी रात्री भीषण अपघातात मृत्यू झाला.
राजगुरुनगर : पत्नी आणि मुलांकडे आपल्या घराकडे परतणाऱ्या एका पोलीस अंमलदारावर काळाने वाटेतच घाला घातला आहे. घरात सगळे वाटच पाहात राहिले, पण शशिकांत घरी पोहोचलेच नाही. चाकणमधील महाळुंगे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शशिकांत श्रीधर होले (वय ३७, रा. होलेवाडी) यांचा शनिवारी रात्री भीषण अपघातात मृत्यू झाला. रिक्षाने अचानक वळण घेतल्याने झालेल्या या अपघातात एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा आधारवड हरपला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शशिकांत होले आपल्या बुलेटवरून होलेवाडी येथील घराकडे जात होते. पाबळ रोडवरील चव्हाण मळा, टाकळकरवाडी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या एका रिक्षाने अचानक वळण घेतले. यावेळी रिक्षा आणि बुलेटची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत होले रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
advertisement
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होले यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला झालेली जखम अतिशय खोल असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शशिकांत होले यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. बाबांची वाट पाहणाऱ्या चिमुरड्यांवर आणि पत्नीवर आभाळ कोसळले आहे.
राजगुरुनगर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलातील एका उमद्या सहकाऱ्याच्या निधनाने महाळुंगे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 2:02 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हृदयद्रावक! पत्नी अन् मुलं वाटच बघत राहिले; घरी जाताना वाटेतच पुण्यातील पोलिसाचा धक्कादायक शेवट










