कुख्यात गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरू, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कुख्यात गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. पुणे पोलिसांनी घायवळच्या मुसक्या आवळून भारतात आणण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. काही दिवसांपूर्वी घायवळ टोळीच्या काही जणांनी कोथरुड परिसरात दहशत पसरवली होती. त्यांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर अन्य एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले होते. एकाच रात्री दोन अशाप्रकारच्या घटना घडल्याने पुणे शहर हादरलं होतं.
या प्रकरणी पोलिसांनी घायवळ टोळीच्या साथीदारांना अटकही केली. पण तेव्हापासून घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ मात्र सातत्याने चर्चेत आहे. कोथरुड प्रकरण घडल्यानंतर निलेश घायवळ ९० दिवसांच्या व्हिजावर भारत सोडून पळाला आहे. सुरुवातीला लंडन आणि त्यानंतर स्वित्झर्लंडमध्ये तो पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे परदेशात पळून जाण्यासाठी घायवळने बनावट पासपोर्ट वापरल्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं. कोथरूड गोळीबार प्रकरणापासून निलेश घायवळवर पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
advertisement
या सगळ्या घडामोडीनंतर निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. पुणे पोलिसांनी घायवळच्या मुसक्या आवळून भारतात आणण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. पोलिसांनी निलेश घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. यामुळे आता घायवळच्या परदेशातून मुसक्या आवळून भारतात आणणं शक्य होणार आहे.
निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्यावरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात यावा, यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. लवकरच न्यायालयात पासपोर्ट रद्द करण्याबाबतची सुनावणी होईल. या टोळी संबंधित आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता, पुण्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी व्यक्त केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 11, 2025 1:14 PM IST