Sunspots : आकाशात दुर्मिळ खगोलीय घटना! पुढील 10 दिवस सूर्याकडे बघताच दिसणार हे नयनरम्य दृश्य, आवर्जून पाहा
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सौर डागांच्या संख्येत होणारी वाढ ही सूर्याच्या ११ वर्षांच्या चक्रावर अवलंबून असते. जेव्हा सौर डागांची संख्या सर्वाधिक असते, तेव्हा त्याला 'सोलर मॅक्सिमम' म्हणतात.
पुणे: खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या 10 दिवसांत सूर्याच्या पृष्ठभागावर मोठे 'सौर डाग' (Sunspots) दिसणार आहेत. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे निर्माण होणारे हे काळे डाग अत्यंत दुर्मिळ मानले जातात. अशा प्रकारचे विस्तीर्ण डाग यापूर्वी 1947 आणि ऑक्टोबर 2014 मध्ये दिसून आले होते.
नेमके काय आहेत सौर डाग?
मुंबईतील नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्याच्या दृश्य पृष्ठभागाला 'फोटोस्फीअर' म्हणतात. सध्या हा भाग अनेक काळ्या डागांनी व्यापलेला आहे. हे डाग म्हणजे सूर्यावरील असे भाग आहेत जिथे तापमान आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा कमी असते. फोटोस्फीअरचे तापमान साधारणपणे ६,३०० अंश सेल्सिअस असते, तर सौर डागांचे तापमान ४,००० अंश सेल्सिअसच्या आसपास असते. तापमान कमी असल्याने हे भाग गडद किंवा काळे दिसतात.
advertisement
सौर डागांचे महत्त्व आणि परिणाम:
सौर डागांच्या संख्येत होणारी वाढ ही सूर्याच्या ११ वर्षांच्या चक्रावर अवलंबून असते. जेव्हा सौर डागांची संख्या सर्वाधिक असते, तेव्हा त्याला 'सोलर मॅक्सिमम' म्हणतात. या डागांमुळे सूर्यावर शक्तिशाली 'सौर ज्वाला' निर्माण होतात. यामुळे अवकाशात विद्युतभारीत कण फेकले जातात, ज्याला 'कोरोनल मास इजेक्शन' म्हणतात. जेव्हा हे कण पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात पोहोचतात, तेव्हा आकाशात Auroral displays म्हणजेच रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण पाहायला मिळते.
advertisement
सूर्याचे थेट डोळ्यांनी निरीक्षण करणे अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे सौर डाग पाहण्यासाठी 'टेलिस्कोप'चा वापर करून सूर्याची प्रतिमा कागदावर पाहावी किंवा प्रमाणित 'सोलर फिल्टर्स' आणि 'एक्लिप्स गॉगल्स'चा वापर करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
ऐतिहासिक संदर्भ: सौर डागांच्या नोंदींचा इतिहास खूप जुना आहे. इ.स.पू. २८ मध्ये चिनी खगोलशास्त्रज्ञांनी सर्वप्रथम सौर डागांचे निरीक्षण केले होते. आधुनिक काळात थॉमस हॅरियट आणि गॅलीलिओ गॅलीली यांनी दुर्बिणीच्या साह्याने सूर्याचे रेखाचित्र काढून सौर डागांच्या नोंदी केल्या होत्या. गॅलीलिओच्या रेखाचित्रांमध्ये सौर डागांमधील गडद भाग (अम्ब्रा) आणि फिक्कट भाग (पेनम्ब्रा) यांचे स्पष्ट वर्णन आढळते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2025 10:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Sunspots : आकाशात दुर्मिळ खगोलीय घटना! पुढील 10 दिवस सूर्याकडे बघताच दिसणार हे नयनरम्य दृश्य, आवर्जून पाहा


