सायकल मॅन प्रविणची गोष्ट! आतापर्यंत 2000 सायकलींचं विद्यार्थ्यांना केलं वाटप, कारण ऐकून कराल कौतुक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Inspiring Story: पुण्यात राहत असताना उच्चशिक्षित प्रविण महाजन यांना सोसायट्यांमध्ये पडलेल्या बेवारस सायकली दिसल्या. त्यावर त्याने अनोखा उपक्रम सुरू केला.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : आपल्या देशात अजूनही असे अनेक विद्यार्थी आहेत जे शिक्षणासाठी दूरवर पायी चालत जातात. ही अडचण लक्षात घेऊन एका उच्चशिक्षित तरुणाने एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. तो स्वतःच्या प्रयत्नातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सायकली मोफत देत असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासात मदतीचा हात देत आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
advertisement
नांदेडचा प्रविण महाजन हा तरुण, सध्या पुण्यात मोशी-भोसरी परिसरात वास्तव्यास आहे. मूळचे गाव नंदुरबार जिल्ह्यातील असून, हा भाग आदिवासी व ग्रामीण आहे. स्वतःच्या बालपणी त्याने पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळेत पायी जाऊन शिक्षण पूर्ण केलं. गरीबीमुळे सायकल खरेदी करणे शक्य नव्हते. हीच परिस्थिती इतर अनेक विद्यार्थ्यांचीही असल्याचे त्याने पुण्यात आल्यावर पाहिलं.
advertisement
कामानिमित्त पुण्यात राहत असताना प्रविणच्या लक्षात आलं की अनेक सोसायट्यांमध्ये जुन्या सायकली बेवारस अवस्थेत पडून असतात, तर अनेक गरीब विद्यार्थी अजूनही पायी शाळेत जातात. यावर उपाय म्हणून प्रविणने 2020 पासून जुन्या सायकली घेऊन दुरुस्त करून देयच्या या संकल्पनेतून उपक्रम सुरू केला. सोसायट्यांना आवाहन करून त्यांनी जुन्या सायकली जमा केल्या आणि त्या दुरुस्त करून नंदुरबार, धुळे, जळगाव, पुरंदर, खेड आदी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटल्या.
advertisement
प्रविण महाजन यांनी आजवर 2000 हून अधिक सायकली वाटप केल्या आहेत. सोशल मीडियाचा उपयोग करत त्यांनी फेसबुक व व्हॉट्सॲपवर पोस्ट करून लोकांपर्यंत हे आवाहन पोहोचवलं. ‘निर्माण’ संस्थेच्या मदतीने आणि युवक मित्रपरिवार ग्रुपच्या माध्यमातून दुरुस्तीचा खर्च उचलला जातो. प्रत्येक सदस्य उत्पन्नाचा दोन टक्के भाग या कार्यासाठी देतो.
मुख्यतः 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायकली दिल्या जातात. प्रविण महाजन सांगतात की, जर तुमच्याकडे सायकल वापरात नसेल आणि तुमचा पाल्य शिक्षण पूर्ण करून बाहेर गेला असेल, तर ती सायकल आम्हाला द्या. आम्ही ती दुरुस्त करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. प्रविणचा हा उपक्रम केवळ सायकली देणारा नाही, तर शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या पावलांना बळ देणारा आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 23, 2025 4:17 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
सायकल मॅन प्रविणची गोष्ट! आतापर्यंत 2000 सायकलींचं विद्यार्थ्यांना केलं वाटप, कारण ऐकून कराल कौतुक