अबब! पीएमपीएलच्या नवीन धोरणानं फुकट प्रवाशांना बसणार धक्का, नेमकं होणार काय?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
या उपक्रमामुळे दंड वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता येणार असून, रोख व्यवहारांमुळे होणारे वाद आणि गैरसमज टाळले जाणार आहेत.
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) आधुनिकतेकडे वाटचाल करत तिकीट तपासनीसांना ऑनलाइन दंड आकारणीसाठी क्यूआर कोड मशीन उपलब्ध करून दिली आहेत. या उपक्रमामुळे दंड वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता येणार असून, रोख व्यवहारांमुळे होणारे वाद आणि गैरसमज टाळले जाणार आहेत.
सध्या पीएमपीएलकडे 25 तिकीट तपासणी पथके असून त्यातील 20 पथकांना क्यूआर कोड मशीन देण्यात आली आहेत. या मशीनच्या माध्यमातून तिकीट तपासनीस विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून थेट ऑनलाइन दंड स्वीकारू शकतील. या नव्या पद्धतीमुळे दंडाची रक्कम थेट पीएमपीच्या अधिकृत खात्यात जमा होईल, असे पीएमपीएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सांगितले.
advertisement
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत पीएमपीएलकडून रोज हजारो प्रवाशांची वाहतूक केली जाते. गर्दीच्या वेळेत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याने प्रशासनाला वारंवार अडचणी येत होत्या. सध्या पीएमपीएलकडे सुमारे 150 तिकीट तपासनीस असून, महिन्याला साधारण दीड ते दोन हजार फुकटे प्रवाशांवर कारवाई केली जाते. या माध्यमातून आठ ते नऊ लाख रुपयांचा दंड वसूल केला जातो.
advertisement
यापूर्वी तपासनीस रोख रकमेने किंवा स्वतःच्या यूपीआय कोडद्वारे दंड घेत असत. त्यामुळे प्रवासी आणि तपासनीस यांच्यात वाद निर्माण होण्याच्या घटना घडत होत्या. आता क्यूआर कोड मशीनमुळे ही प्रक्रिया पूर्णतः अधिकृत आणि डिजिटल होणार आहे. प्रवाशांकडे रोख पैसे नसले तरी ते थेट स्कॅन करून ऑनलाइन दंड भरू शकतील.
दरम्यान, पीएमपीएलने 1 जूनपासून तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे प्रशासनाने सांगितले. या पार्श्वभूमीवर पीएमपीने 160 कर्मचाऱ्यांना बढती देऊन त्यांना तिकीट तपासनीस आणि इतर पदांवर नेमले आहे. गेल्या तीन महिन्यांत जवळपास सात ते आठ हजार फुकटे प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पीएमपीएलकडील दंड वसुली प्रक्रिया अधिक सुरक्षित, वेगवान आणि पारदर्शक होईल. डिजिटल पेमेंट सुविधेमुळे प्रवाशांमध्येही विश्वास निर्माण होईल आणि विनातिकीट प्रवासावर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पीएमपीएल प्रशासनाने व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 10, 2025 8:11 AM IST


