Pune Metro : गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे मेट्रोने रचला महसुलाचा नवा विक्रम; लाखोंच्या प्रवासातून तब्बल 5 कोटींचा टप्पा
Last Updated:
Ganpati Festival Pune : विसर्जनाच्या दिवशी पुणेकरांनी मेट्रोला प्रचंड प्रतिसाद दिला. तब्बल सहा लाख प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास करत शहरातील वाहतूककोंडीला पर्याय निवडला. दहा दिवसांच्या गणेशोत्सवात सुमारे 35 लाख नागरिकांनी मेट्रोचा वापर केला.
पुणे : पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, सामाजिक आणि सांस्कृतिक पर्व म्हणूनही ओळखला जातो. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरात नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. यंदा मात्र, पुणे मेट्रोने नागरिकांसाठी प्रवास अधिक सुलभ करून दिला. त्यामुळे विसर्जनदिनी तब्बल 5 लाख 90 हजारांहून अधिक प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला, तर गेल्या दहा दिवसांत जवळपास 35 लाख प्रवासी मेट्रोतून सफर करून गेले. यामुळे मेट्रो प्रशासनाला तब्बल 5 कोटी 28 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
यंदा विशेष म्हणजे मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. याचा थेट फायदा नागरिकांना झाला. मध्यवर्ती भागात मिरवणूक पाहण्यासाठी जाणाऱ्यांनी मोठ्या संख्येने मेट्रोला प्राधान्य दिले. त्यामुळे रस्त्यावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आणि नागरिकांना त्रास न होता उत्सवाचा आनंद घेता आला. गेल्या वर्षी विसर्जनाच्या दिवशी 3 लाख 46 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र, यंदा ती संख्या 2 लाख 45 हजारांनी वाढून जवळपास 6 लाखांपर्यंत पोहोचली.
advertisement
सध्या मेट्रोची सेवा वनाझ-रामवाडी आणि पिंपरी चिंचवड-स्वारगेट या मार्गांवर उपलब्ध आहे. अलीकडेच सुरू झालेल्या जिल्हा न्यायालय-स्वारगेट मार्गामुळे नागरिकांना मध्यवर्ती भागात थेट पोहोचणे अधिक सोयीचे झाले. या नव्या मार्गाचा प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
विशेष म्हणजे, शहरातील मंडई आणि डेक्कन या स्थानकांवर सर्वाधिक गर्दी दिसून आली. मंडई स्थानकावरून एकाच दिवशी 65 हजार 542 प्रवासी, तर डेक्कन स्थानकावरून 64 हजार 703 प्रवासी प्रवास करताना नोंदले गेले. मंडई हे शहराच्या हृदयस्थानी असून, अनेक मानाच्या गणपती मंडळांच्या जवळ असल्यामुळे तेथून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली. त्यामुळे गर्दी नियंत्रण आणि सुविधांसाठी मेट्रो प्रशासनाने विशेष नियोजन केले.
advertisement
प्रवाशांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज मेट्रो प्रशासनाला आधीच होता. त्यामुळे गर्दी हाताळण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले. यामुळे प्रवाशांना मार्गदर्शन मिळाले आणि गोंधळ कमी झाला. एकूणच, या नियोजनाचा फायदा प्रवाशांना आणि प्रशासनालाही झाला.
यंदाचा अनुभव पाहता पुणेकरांनी मेट्रोला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. उत्सव काळात प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी मेट्रो उपयुक्त ठरली असून, पुढील वर्षांमध्येही नागरिकांचा कल अधिक वाढण्याची शक्यता आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी नागरिकांनी रस्त्यावरील गोंधळ टाळून मेट्रोसारख्या आधुनिक वाहतूक सुविधेकडे वळल्याने उत्सवाचा आनंद अधिक सुरळीत आणि सुखकर झाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 08, 2025 8:25 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro : गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे मेट्रोने रचला महसुलाचा नवा विक्रम; लाखोंच्या प्रवासातून तब्बल 5 कोटींचा टप्पा