Pune News: मायभूमी युद्धाने होरपळली, पुण्यात इराणी विद्यार्थ्यांसमोर नवं संकट, पोलीसही आले पुढे!
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: पुणे पोलिसांकडून विशेषतः धार्मिक स्थळांभोवती आणि प्रमुख चौक, बाजारपेठा, मॉल्स, बसस्थानके, रेल्वे स्थानके अशा गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त वाढवण्यात आली आहे.
पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील भाग, धार्मिक स्थळे तसेच गर्दीची ठिकाणे येथे पोलिसांचा वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबत अधिकृत माहिती देत शहरभर गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. ही उपाययोजना पूर्णपणे खबरदारीचा भाग असून नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावाचा परिणाम स्थानिक कायदा व सुव्यवस्थेवर होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिसांकडून विशेषतः धार्मिक स्थळांभोवती आणि प्रमुख चौक, बाजारपेठा, मॉल्स, बसस्थानके, रेल्वे स्थानके अशा गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त वाढवण्यात आली आहे. संवेदनशील मानल्या जाणाऱ्या भागांमध्ये अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे देखरेख अधिक काटेकोर करण्यात आली आहे.
advertisement
नागरिकांसाठीही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाचा 112 हा क्रमांक उपलब्ध असून, आवश्यकता असल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, पुण्यात सध्या 120 ते 125 इराणी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस विशेष शाखेकडून देण्यात आली. हे नागरिक पर्यटन, व्यावसायिक, वैद्यकीय तसेच विद्यार्थी व्हिसावर शहरात आहेत. सुमारे 30 इराणी महिला भारतीय नागरिकांशी विवाह करून येथे स्थायिक झाल्या आहेत. तसेच अंदाजे 60 इराणी विद्यार्थी पुण्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत.
advertisement
ज्यांच्या व्हिसाची मुदत संपत आली आहे, अशा नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्हिसा मुदतवाढ देण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे. पुणे पोलीस विशेष शाखा विद्यार्थ्यांशी व इतर इराणी नागरिकांशी थेट समन्वय साधणार असून, आवश्यक ती मदत केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
शहरातील वाढीव सुरक्षा व्यवस्था ही केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना असून कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य केलेले नाही, असे प्रशासनाने सांगितले. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखणे हेच प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 10:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: मायभूमी युद्धाने होरपळली, पुण्यात इराणी विद्यार्थ्यांसमोर नवं संकट, पोलीसही आले पुढे!







