उरुळी कांचनमध्ये धक्कादायक प्रकार, घरासमोरच बाहुल्या, खिळे मारलेले लिंबू; परिसरात खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
घरासमोर अज्ञात व्यक्तीकडून जादूटोण्याशी संबंधित साहित्य ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : उरुळी कांचनमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आश्रम रोड परिसरातील गणेश हनुमंत कांचन यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तीकडून जादूटोण्याशी संबंधित साहित्य ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास कांचन कुटुंबीयांनी घराबाहेर येताच दरवाजासमोर ठेवलेली एक प्लास्टिक पिशवी त्यांच्या निदर्शनास आली. संशयाने पिशवी उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये दोन काळ्या रंगाच्या बाहुल्या आढळून आल्या. त्यापैकी एका बाहुलीला खिळे मारलेले होते. यासोबतच अर्धवट चिरलेली सहा लिंबे आणि काही इतर संशयास्पद साहित्यही पिशवीत ठेवण्यात आले होते.
कांचन कुटुंबीयांमध्ये प्रचंड घबराट
advertisement
हा प्रकार अचानक घरासमोर आढळून आल्याने कांचन कुटुंबीयांमध्ये प्रचंड घबराट पसरली. विशेषतः घरातील लहान मुले आणि महिलांवर या घटनेचा मानसिक परिणाम झाला असून, काही काळ भीतीचे वातावरण कायम होते. जादूटोना किंवा अंधश्रद्धा पसरवण्याच्या हेतूनेच हे कृत्य करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नागरिकांची घटनास्थळी गर्दी
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केली. अंधश्रद्धेच्या अशा प्रकारांमुळे समाजात भीती, गैरसमज आणि तणाव निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. उरुळी कांचनसारख्या ग्रामीण भागात अशा घटना घडणे ही चिंतेची बाब असल्याचे मतही नागरिकांकडून मांडण्यात आले.
advertisement
सीसीटीव्ही फुटेज तपासणार
या घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. सदर प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
कठोर कारवाईची मागणी
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 9:22 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
उरुळी कांचनमध्ये धक्कादायक प्रकार, घरासमोरच बाहुल्या, खिळे मारलेले लिंबू; परिसरात खळबळ







