बाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात! दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Dagdusheth Ganpati: नववर्षाच्या निमित्ताने दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे
पुणे : नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद आणि उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असून, पुण्यातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. आज, 1 जानेवारी रोजी पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिकांनी मंदिर परिसरात हजेरी लावली असून, रात्रीपासूनच भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वांचा लाडका बाप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक मंदिरात दाखल झाले आहेत.
आज दिवसभरात सुमारे पाच लाख भाविक दर्शन घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने व्यापक तयारी करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात सुमारे 200 सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. पोलिस, स्वयंसेवक आणि ट्रस्टचे कार्यकर्ते समन्वयाने काम करत असून, गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
गुरुवारी सकाळपासून मंदिरात अभिषेक, गणेश याग तसेच विविध धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडत आहेत. नववर्षाच्या मुहूर्तावर बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची लांबच लांब रांग पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी दर्शनाची रचना सुटसुटीत ठेवण्यात आली आहे.
advertisement
जे भाविक प्रत्यक्ष मंदिरात येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे देश-विदेशातील भक्तांनाही घरबसल्या दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेता येत आहे.
नववर्षाच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. रंगीबेरंगी फुलांची आरास, प्रकाशयोजना आणि भक्तांचा जयघोष यामुळे मंदिर परिसरात उत्सवाचे स्वरूप आले आहे. भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन सुरू आहे.
advertisement
भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असून, ट्रस्टच्या माध्यमातून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती दगडूशेठ गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाच्या दर्शनाने पुणेकरांनी आनंद, श्रद्धा आणि भक्तीभावाने नववर्षाचे स्वागत केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 2:40 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
बाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात! दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, Video








