Same Sex Marriage: राम आणि श्याम लग्नबंधनात, पुण्यात 20 वर्षांनी झाला अनोखा विवाह
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Same Sex Marriage: पुण्यात नुकतेच एक अनोखा विवाह सोहळा संपन्न जाला. समलिंगी जोडपं राम आणि श्याम लग्नबंधनात अडकलं.
पुणे : प्रेमाला कुठलेही बंधन नसतं. प्रेमाची भावना ही जात, धर्म, लिंग याच्या पलीकडे समानतेची आणि विश्वासाची असते. याच भावनेतून पुण्यात एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. ‘मिस्ट एलजीबीटीक्यू फाउंडेशन’चे सह-संस्थापक श्याम आणि राम हे जोडपे विवाहबद्ध झाले. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या या भव्य विवाहसोहळ्यात पारंपरिक हिंदू आणि ख्रिश्चन विधी, ढोल-ताशांचा गजर, आणि समुदायाचा जिव्हाळा यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले.
तीन दिवस चाललेल्या या विवाह समारंभात हळदी, मेहंदी, संगीत असे सर्व पारंपरिक सोहळे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. पहिल्या दिवशी दाक्षिणात्य हिंदू परंपरेनुसार विवाह पार पडला. तर संध्याकाळी ख्रिश्चन विधीनुसार पुन्हा एकदा दोघांनी एकमेकांशी आयुष्यभरासाठी वचनबद्धतेची गाठ बांधली.
advertisement
या समारंभात ‘शिकंडी ढोल ताशा पथक’ सहभागी झाल्याने सोहळ्यात अजूनच रंगत भरली. प्रेमाचा हा सोहळा अधिकच संस्मरणीय झाला. या विवाहासाठी एलजीबीटीक्यू समुदायातील अनेक सदस्य, कुटुंबीय, मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांचा पाठिंबा आणि उपस्थिती ही समतेच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण पावलं मानली जात आहेत.
“हे लग्न समाजात आपण उचललेल्या प्रगतीचे प्रतीक आहे. LGBTQ+ समुदायासाठी हा विवाह एक प्रेरणादायी उदाहरण आहे, ज्यातून त्यांना आपले प्रेम उघडपणे स्वीकारण्याची ताकद मिळेल. पुण्यात 20 वर्षांपूर्वी प्रथम समलैंगिक विवाह पार पडला होता. त्यानंतर श्याम आणि राम यांचा विवाह हा एक नवा टप्पा आहे. जिथे प्रेम कोणत्याही लिंग किंवा लैंगिकतेच्या चौकटीत न अडकता खुलेपणाने साजरे केले जाते,” असं शिकंडी ढोल ताशा संस्थेच्या संस्थापक मनस्वी म्हणाल्या.
advertisement
दरम्यान, पुण्यात संपन्न झालेला हा विवाहसोहळा समाजाला प्रेम, अभिमान याबद्दलचा नवा संदेश देतो. प्रेमावर कोणतेही बंधन नसते आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचे प्रेम सन्मानाने जपण्याचा पूर्ण हक्क आहे, हे या विवाहाने दाखवून दिले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
June 17, 2025 12:34 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Same Sex Marriage: राम आणि श्याम लग्नबंधनात, पुण्यात 20 वर्षांनी झाला अनोखा विवाह

