advertisement

300 वर्षांचा इतिहास, प्रसिद्ध तांबट आळी आता संकटात, पुणेकरांनी का फिरवली पाठ?

Last Updated:

तांबट आळी ही तांबे-पितळ भांडी बनवण्याच्या पारंपरिक कलेसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 300 वर्षांचा इतिहास असलेल्या या आळीत एकेकाळी 250 पेक्षा अधिक कारखाने कार्यरत होते.

+
कारखाने 

कारखाने 

पुणे : पुण्यातील कसबा पेठ परिसरातील ऐतिहासिक तांबट आळी ही तांबे-पितळ भांडी बनवण्याच्या पारंपरिक कलेसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे 300 वर्षांचा इतिहास असलेल्या या आळीत एकेकाळी 250 पेक्षा अधिक कारखाने कार्यरत होते. मात्र वाढती महागाई, बदलती जीवनशैली आणि प्लास्टिक-स्टीलच्या भांड्यांचा वाढता वापर यामुळे या पारंपरिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून आज या आळीत अवघे 25 ते 50 कारखानेच उरले आहेत.
तांबट आळीचा इतिहास हा मराठा साम्राज्याच्या काळाशी जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येथे तलवारींच्या मुठी तयार करणे, ताम्रपट बनवणे यांसारखी कामे केली जात होती. पुढे पेशव्यांच्या काळात कसबा पेठेत या कारागिरांना वसवण्यात आले आणि तांबे-पितळ भांडी बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला. त्यानंतर ब्रिटिश काळात पत्रा उपलब्ध झाल्यानंतर भांडी तयार करण्याचे काम अधिक सोयीस्कर झाले.
advertisement
तांबट आळीतील ज्येष्ठ कारागीर भारत निजामपूरकर सांगतात की, आमच्या आजोबांच्या काळात दीडशे ते पावणे दोनशे कारखाने येथे चालत होते. त्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर तांबे-पितळ भांडी वापरत होते. परंतु कालांतराने स्टील आणि प्लास्टिकच्या भांड्यांनी बाजारपेठ व्यापली. त्यामुळे तांबे-पितळ भांड्यांची मागणी कमी होत गेली.
advertisement
पूर्वी एका कारखान्यात आठ ते दहा कारागीर काम करत असत. हाताने ठोकून भांडी तयार करण्याची ही प्रक्रिया अत्यंत कष्टाची आणि वेळखाऊ असते. मात्र आज परिस्थिती बदलली असून बहुतांश कारखान्यांमध्ये एकच कारागीर काम करताना दिसतो. दिवसाचे 10 ते 12 तास काम करूनही उत्पन्न मर्यादित असल्यामुळे या व्यवसायाकडे तरुण पिढीचा कल कमी झाला आहे.
advertisement
तांबे आणि पितळ यांचे दरही गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे या धातूंच्या भांड्यांची किंमत सर्वसामान्यांना परवडणारी राहिलेली नाही. परिणामी ग्राहक स्टील किंवा प्लास्टिकच्या स्वस्त पर्यायांकडे वळत आहेत. याचाच थेट परिणाम तांबट आळीतील कारखान्यांवर झाला आहे.
तांबट आळीतील तिसऱ्या पिढीचे कारागीर गणेश कर्डे सांगतात की, आमचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील कोकण भागात आहे. आमचे आजोबा कामाच्या निमित्ताने पुण्यात आले आणि येथेच स्थायिक झाले. आम्ही हांडे, तपेले, कळश्या अशी विविध भांडी तयार करत होतो. आजही ग्राहकांच्या मागणीनुसार वस्तू तयार करतो. मात्र पूर्वी 250 कारखाने असताना आता अवघे 50 कारखाने शिल्लक राहिले आहेत.
advertisement
पूर्वी तयार केलेली भांडी पुण्यासह राज्यातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवली जात असत. आजही काही व्यापारी या आळीतून भांडी खरेदी करून बाजारात विक्री करतात. मात्र उत्पादनाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी झाले आहे.
तांबट आळी ही केवळ व्यवसायाची जागा नसून पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. या पारंपरिक कलेचे जतन करण्यासाठी शासनाकडून विशेष योजना, प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच पर्यटनाच्या माध्यमातून या कलेला चालना दिल्यास कारागिरांना नवी संधी मिळू शकते.
advertisement
आज तांबट आळीतील कारागीर परंपरा जपत आपल्या हातातील कौशल्य टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र बदलत्या काळात या पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी देणे आवश्यक असल्याचे मत कारागिरांकडून व्यक्त केले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
300 वर्षांचा इतिहास, प्रसिद्ध तांबट आळी आता संकटात, पुणेकरांनी का फिरवली पाठ?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement