पुण्याच्या मुळा- मुठा नदीला वाचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कशा पद्धतीने होणार वापर ?
- Reported by:Niranjan Sherkar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा– मुठा नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी एक महत्त्वाचा आणि आधुनिक उपक्रम राबवण्यात येणार आहे.
पुणे: पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा– मुठा नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी एक महत्त्वाचा आणि आधुनिक उपक्रम पुण्यात राबवण्यात येणार आहे. वर्शिप अर्थ फाउंडेशन आणि शिपको आय.टी. कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने “माय रिव्हर माय व्हॅलेन्टाईन” या अभिनव अभियानांतर्गत "Trash Boom" तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती 'लोकल 18' शी बोलताना दिनेश कदम यांनी दिली आहे.
मुळा– मुठा नदी ही पुणे शहरासाठी केवळ पाण्याचा स्रोत नसून सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र गेल्या काही वर्षांत नदीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा, थर्माकोल, फुलांचे हार, पूजा सामग्री आणि घरगुती घनकचरा टाकला जात असल्याने नदीचे नैसर्गिक स्वरूप धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषण रोखण्यासाठी तांत्रिक उपाययोजनांची गरज निर्माण झाली होती. याच गरजेची दखल घेत "Trash Boom" हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुण्यात प्रथमच वापरण्यात येत आहे.
advertisement
"Trash Boom" तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहात तरंगणारा कचरा अडवून तो एका ठराविक ठिकाणी साठवला जातो. त्यामुळे कचरा पुढे वाहून जाण्यापासून थांबतो आणि त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावता येते. विशेष म्हणजे, या प्रक्रियेमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही अडथळा येत नाही. “माय रिव्हर माय व्हॅलेन्टाईन” हे अभियान नदीशी असलेले भावनिक नाते अधोरेखित करणारे आहे. प्रेमदिनी नदीला स्वच्छतेची भेट देण्याचा हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता, दीर्घकालीन नदीसंवर्धनाचा संदेश देणारा ठरणार आहे.
advertisement
या उपक्रमात स्वयंसेवक, पर्यावरणप्रेमी नागरिक, तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. वर्शिप अर्थ फाउंडेशनचे दिनेश कदम यांनी सांगितले की, “नदी ही केवळ पाण्याची वाहिनी नसून ती जिवंत परिसंस्था आहे. Trash Boom सारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदूषण रोखणे हे पहिले पाऊल असून, नागरिकांची मानसिकता बदलणे हे खरे उद्दिष्ट आहे.” या उपक्रमामुळे मुळा– मुठा नदीतील कचरा नियंत्रणात येण्यास मदत होणार असून, भविष्यात पुणे शहरातील इतर जलस्रोतांवरही असे प्रयोग राबवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नदी स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 7:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या मुळा- मुठा नदीला वाचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कशा पद्धतीने होणार वापर ?








