Pune Police : कारागृहाने चार वेळा सांगूनही ललित पाटीलला आश्रय, ससून रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pune Police : ससून रुग्णालयाला चारवेळा पत्रव्यवहार करुनही आरोपी ललित पाटील ताब्यात दिलं नाही. त्यामुळे आता रुग्णालया प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
पुणे, 3 ऑक्टोबर (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : ड्रग्स तस्करी प्रकरणात ससून रुग्णालयातील पोलीस लॉकअपमध्ये असणाऱ्या आरोपीने संशयास्पदरित्या पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. ललित पाटील असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर एका अधिकाऱ्यासह 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे ससून रुग्णलयात या आरोपीला तब्बल 16 महिने का ठेवलं? पोलिसांनी वारंवार पत्र लिहूनही आरोपीला का ताब्यात दिलं नाही? रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट कसं सुरू होतं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ससून रुग्णालयात कैद्यांना अधिककाळ ठेवण्यामागे अर्थकारण?
ड्रग्स तस्करीच्या गुन्ह्यात अटक होऊन येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला कैदी ललित अनिल पाटील (वय-34, रा. नाशिक) हा तीन जून 2023 पासून ससून रुग्णालयात दाखल होता. मात्र, डिसेंबर 2020 पासून त्याच्या कारागृहातील कालावधीपैकी तो एकूण 16 महिने ससून रुग्णालयात वेगवेगळ्या आजाराची कारणे सांगून मुक्कामी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पाटील याची वैद्यकीय तपासणी करुन त्यास पुन्हा कारागृहात पाठविण्यात यावे याबाबत येरवडा कारागृहाने ससून रुग्णालयास चारवेळा लेखी पत्र देऊनही त्याला पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले नसल्याचे दिसून आल आहे. त्यामुळे शासकीय ससून रुग्णालयात कैद्यांना अधिकाकाळ ठेवण्यात नेमके कोणते अर्थकारण शिजत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
advertisement
तसेच पाटील यास रुग्णालयात अधिककाळ आश्रय देण्यात कोणते अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत, त्यांची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. येरवडा कारागृहातील एकूण 16 कैदी सध्या ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16, 15, 12, 11 मध्ये विविध आजारांचे उपचार घेत आहे. यापैकी सात कैदी हे चार महिन्यापेक्षा अधिक काळ ससून रुग्णालयात उपचाराकरिता असल्याने त्यांचेवरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाले असल्यास सदर कैद्यांना त्वरीत डिस्चार्ज देवून त्यांना कारागृहात वर्ग करण्यात यावे, असे लेखी पत्र येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या वतीने ससून रुग्णालयाचे अधिष्ठता व वैद्यकीय अधीक्षक यांना दिले आहे. तसेच त्याबाबतची प्रत शिवाजीनगर न्यायालय व अपर पोलीस महासंचालक कार्यालयास देखील देण्यात आली आहे.
advertisement
येरवडा कारागृहातील सदर 16 न्यायाधीन कैदी हे बंदी कारागृह वैद्यकीय अधिकारी यांचे सल्ल्याने पुढील उपचाराकरिता ससून रुग्णालयात आंततरुग्ण म्हणून दाखल आहे. 16 कैद्यांचेवरील उपचाराबाबतच्या वैद्यकीय तपासण्या, वैद्यकीय उपचाराबाबतचा अहवाल येरवडा कारागृहास ससून रुग्णालयाने सादर करावे असे सांगितले गेले. परंतु, त्यास रुग्णालयाने केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे जे सात कैदी चार महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात आहे, त्यांची वैद्यकीय समितीमार्फेत तपासणी करुन त्यांना डिस्चार्ज देवून कारागृहात पाठवावे असे सांगण्यात आलेले आहे. आरोपी ललीत पाटील हा आत्तापर्यंत पोटदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी, टीबी, अल्सर, हर्निया अशी वेगवेगळी कारणे सांगून रुग्णालयात थांबलेला आहे. रुग्णालयाचे वतीने त्याचे हर्निया शस्त्रक्रिया करावयाची असल्याचे कारागृहास कळविण्यात आले. परंतु, त्याबाबत रुग्णाची नेमकी सद्यस्थिती माहिती दिली गेली नाही. त्यामुळे नेमके रुग्णालयात दाखल करण्यात आलेले कैदी हे उपचाराच घेत आहे की दुसऱ्या गुन्हेगारी भानगडी करतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली ड्रग रॅकेट?
कारागृहाचे सततच्या पाठपुराव्यानंतर ससून रुग्णालयाने येरवडा कारागृहास एक लेखी पत्र पाठवून रुग्णाचे आजाराबाबत माहिती दिली. त्यामध्ये कैदी ललीत पाटील यास टीबी, पाठीचा आजार, हर्निया, कोलेस्टेरॉलमुळे जाडी वाढल्याचे सांगण्यात अले. या आजारांचे दृष्टीने त्याच्यावर वेगवेगळ्या विभागात उपचार सुरू असल्याचे कळविण्यात आले. तसेच त्याचे हर्निया शस्त्रक्रिया करण्याचे दृष्टीने शारिरिक क्षमता तपासणी तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मधून ललीत पाटील हा ड्रग तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचे पोलीस छाप्यात निष्पन्न झाले. तब्बल दोन कोटी 14 लाख रुपयांचे अंमली पदार्थाचे पार्सल त्याने रुग्णालयातून साथीदाराकडे पाठविल्याचे देखील उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. नेमके हे पार्सल त्यास कोणी दिले, त्याचे अन्य साथीदार कोण, पैसे घेऊन कोण त्याला आश्रय देते. तसेच रुग्णालयात असताना त्याचेकडे दोन लाख 20 हजार रुपये किंमतीचे दोन आयफोन कोणी वापरण्यास दिले? असे प्रश्न निर्माण झाले आहे.
advertisement
राजकीय बस्तान बांधण्याचे पाटीलचे मनसुबे
आरोपी ललित पाटील हा ड्रग्स तस्करी मधील मोठा डिलर असून तो अंमली पदार्थ उत्पादकांकडून मेफेड्रॉन अंमली पदार्थ घेऊन ते हायप्रोफाईल लोकांना विक्री करुन पैसे कमवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नाशिकमध्ये एका नामांकित राजकीय पक्षाकडून त्याने नगरसेवक पदाची निवडणूक देखील लढली. परंतु, त्यामध्ये त्यास पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर काळ्या व्यवहारातून मिळालेल्या पैशातून राजकीय बस्तान बांधण्याचा प्रयत्न पाटील करत होता. ड्रग्स तस्करीतील आरोपींना कायदेशीर सहकार्य करण्यासाठी तो प्रयत्नशील असल्याचे देखील तपासात उघडकीस आले.
advertisement
आरोपी ललिल पाटीलने आज संशयास्पदरीत्या पलायन केले. यानंतर 9 पोलिसांचे निलंबन केले. मात्र, ज्या रुग्णालयातून तो हे सर्व रॅकेट चालवत होता, तिथे काहीच कारवाई का झाली नाही? असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 04, 2023 12:16 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Police : कारागृहाने चार वेळा सांगूनही ललित पाटीलला आश्रय, ससून रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात