व्यंगचित्रकार शि.द. फडणीसांनी गाठली शंभरी, आयुष्यभर विनोदी रेषांमधून केलं सामाजिक भाष्य
- Published by:
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केली. त्यांचा हा शतायुषी प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
पुणे: मराठी साहित्यात आपल्या सहज आणि मार्मिक शैलीने स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारे व्यंगचित्रकार, अशी शिवराम दत्तात्रेय फडणीस (शि.द. फडणीस) यांची ख्याती आहे. 29 जुलै 2025 रोजी त्यांनी वयाची शंभरी पार केली. त्यांनी आपल्या शंभर वर्षांच्या जीवनप्रवासात हजारो चित्रांतून समाजाचं प्रतिबिंब मांडलं. त्यांच्या प्रत्येक रेषेत विनोदाची धार आणि सहानुभूती एकत्रितपणे जाणवते. त्यांनी अनेक दिवाळी अंक आणि मासिकांची मुखपृष्ठे सजवली. राजकीय टीका असो किंवा दैनंदिन जीवनातील साधेपणा, प्रत्येक विषयावर त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून भाष्य केलं. त्यांनी केलेलं कार्य आजही प्रभावी आणि प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्रातील दिवाळी अंकांच्या परंपरेचा उल्लेख फडणीस यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. मोहिनी, हंस, मनोहर अशा लोकप्रिय मासिकांच्या मुखपृष्ठांवर त्यांच्या व्यंगचित्रांनी कित्येक दशकं राज्य केलं. त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रं मथळ्यांशिवायही अर्थपूर्ण आणि प्रभावी ठरत.
बेळगाव जिल्ह्यातील भोज या गावात 29 जुलै 1925 रोजी त्यांचा जन्म झाला. कोल्हापुरात शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईतील 'सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट' येथून पदवी संपादन केली. विद्यार्थीदशेत ‘मनोहर’ मासिकाला पाठवलेलं चित्र प्रसिद्ध झाल्यानंतरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. मोहिनी मासिकाशी त्यांचा पाच दशकांचा संबंध होता. 1950 पासून मोहिनी मासिकासाठी त्यांनी काम केलं. कोणत्याही व्यंगचित्रकाराने भारतीय मासिकासाठी प्रदिर्घ काळ काम करण्याची ही पहिलीच वेळ होती.
advertisement
फडणीस यांच्या चित्रांना मध्यमवर्गीय जीवनातील साधेपणा, दैनंदिन प्रसंग आणि सहृदय विनोदाची समृद्ध पार्श्वभूमी आहे. रेषांमधील नजाकत, सहानुभूतीचा दृष्टिकोन आणि मोजक्या तपशीलांतून खोल अर्थ मांडण्यात त्यांची हातोटी आहे. हस्त रेखाटनांमधून दृष्टी वाढते, निरीक्षणशक्ती वाढते आणि माणसाचं अंतर्मन समजतं, असं शि.द. फडणीस म्हणतात.
1945 साली त्यांच्या चित्राचं पहिलं प्रकाशन झालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी हजारो व्यंगचित्रं रेखाटली आहेत. आजही ते त्याच उत्साहाने समाजावर भाष्य करत आहेत. विनोद, करुणा, आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती ही त्रिसूत्री त्यांनी आपल्या चित्रांतून जपली आहे.
advertisement
एक शतक उलटलं, काळ बदलला, माध्यमं बदलली पण फडणीस यांची रेखाचित्रं आजही समाजाशी नाळ जपणारी आणि काळाच्या पुढे जाणारी ठरतात. त्यांचा हा शतायुषी प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
July 30, 2025 7:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
व्यंगचित्रकार शि.द. फडणीसांनी गाठली शंभरी, आयुष्यभर विनोदी रेषांमधून केलं सामाजिक भाष्य

