शेकडो रेकॉर्ड मोडले! रामनवमीनिमित्त अयोध्येत 15 लाख भाविक दाखल झाले
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
प्रभू श्रीरामांना खास सूर्यकिरणांचा टिळा लावण्यात आला. जगभरातील लाखो भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : अयोध्येतील भव्य राम मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी पार पडलेल्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर पहिली रामनवमी 17 एप्रिलला मोठ्या उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने देशभरातील मठ आणि मंदिरांमध्ये सोहळा साजरा करण्यात आला. देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविकांनी विविध राम मंदिरामध्ये श्रीरामांचं दर्शन घेतलं.
अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तर, प्रभू श्रीरामांना खास सूर्यकिरणांचा टिळा लावण्यात आला. जगभरातील लाखो भाविक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापासून दररोज लाखो भाविक अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन श्रीरामांचं दर्शन घेतात, रामनवमीनिमित्तही इथं भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
advertisement
प्राणप्रतिष्ठापनेनंतर रामनवमीनिमित्त पहिल्यांदा श्रीरामांना सूर्यकिरणांचा टिळा लागला. दुपारी 12 वाजून 4 मिनिटांच्या मुहूर्तावर हे अद्भूत दृष्य पाहता आलं. यासाठी 65 फूट लांबीची यंत्रणा तयार करण्यात आली होती, या संपूर्ण प्रक्रियेत 4 लेन्स आणि 4 आरशांचा वापर झाला.
advertisement
अयोध्येचे डीएम नितीश कुमार यांनी सांगितलं की, रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सुमारे 15 लाख भाविक अयोध्येतील मंदिरांमध्ये दर्शनासाठी आले होते. त्यांनी विविध मठ आणि मंदिरांमध्ये दर्शन घेऊन शरयू नदीत स्नान केलं. यावेळी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी इथं बॅरिकेड्स लावण्यात आले होते.
Location :
Ayodhya,Faizabad,Uttar Pradesh
First Published :
April 18, 2024 7:42 PM IST