यंदा दिवाळीत आहे खास असा योग, वसुबारसला ही संधी सोडू नका
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्सद्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो.
वर्धा, 4 नोव्हेंबर: दिवाळीची सुरुवात वसुबारसेपासून होते. यंदा 9 नोव्हेंबर 2023 ला एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आलंय. हा दुग्धशर्करा योग असल्याचं सांगितलं जातंय. या दिवशी शुभफलप्राप्तीसाठी काय करावं? वसुबारस हा सण नेमका का साजरा केला जातो? वसुबारस कशी साजरी करावी? याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांच्याकडून जाणून घेऊया.
वसुबारसेला दुग्ध शर्करा योग
यंदा 9 नोवबर 2023 रोजी वसुबारस सण महाराष्ट्रभरात साजरा केला जाणार आहे. ग्रामीण भागात वसुबारस मोठ्या उत्साहात साजरा होते. ज्या ठिकाणी गाई आणि गवळी लोकांची वसती आहे त्या ठिकाणी वसुबारसला मोठा उत्साह असतो. यंदा 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजून 41 मिनिटांपर्यंत रमा एकादशी आहे आणि 10 वाजून 42 मिनिटाला द्वादशी सुरू होत आहे. एकादशी आणि बारस दोन्ही दिवसाचे योग एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे हा दुग्ध शर्करा योग असल्याचं पंडित हेमंत शास्त्री पाचखेडे सांगतात.
advertisement
भगवान विष्णूची आराधना
यंदा दिवाळीत एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी असल्याचा दुर्मिळ योग आहे. त्यामुळे या दिवशी श्री विष्णूची आराधना करून विष्णू भगवंताला तुलसी अर्चना करायची आहे. असे केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतील असं पाचखेडे शास्त्री सांगतात. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. स्त्रिया आपल्या मुला-बाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख-समृद्धीसाठी गाईची पूजा करतात.
advertisement
असा साजरा होतो वसुबारस सण
आश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्सद्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता गाय आणि तिच्या वासराची मनोभावे पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
advertisement
असा साजरा करावा सण
या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा करावी. गायीच्या पायावर पाणी टाकावे. गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. वासराची पूजा करावी आणि निरांजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श करावा. गाय- वासराला पुरणाचा किंवा तुमच्या घरी जो असेल तो गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखाटावे आणि जर घरी गाय वासराची मूर्ती असेल तर तिची मनोभावे पूजा करावी, असे हेमंतशास्त्री सांगतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
November 04, 2023 10:55 AM IST