आठवी पूजनाचे काय आहे महत्त्व? विदर्भात घरोघरी होते 'ही' प्रार्थना
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भात कलाष्टमीला आठवी देवीची पूजा केली जाते. पाहा काय आहे परंपरा...
वर्धा, 03 नोव्हेंबर: अश्विन महीन्यात साजरी केली जाणारी कलाष्टमी ही कराष्टमी म्हणूनही ओळखली जाते. विदर्भात अश्विन महीन्यात, दिवाळीच्या आठ दिवसाआधी विशेष कलाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजेला विदर्भातील बोली भाषेत आठवी मातेची पूजा असेही म्हणतात. 2023 म्हणजे यावर्षी 5 नोव्हेंबरला विदर्भात घरोघरी आठवी पूजन केले जाईल. हे पूजन नेमके कसे होते? कशासाठी होते? आठवी पूजनाचे काय महत्व आहे? याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे महाराज यांनी माहिती दिलीय.
कुळाचाराप्रमाणे घरोघरी केले जाते पूजन
विदर्भात आठवी मातेचे पूजन घरोघरी केले जाते. हे पूजन केले जात असताना आपापल्या कुळाचाराप्रमाणे केले जाते. म्हणजे काही घरी 9 मडके, काही घरी 8, तर काही घरी 2 मडके पूजनात असतात. या मातीच्या छोट्या मडक्यांमध्ये कणकेचे वेणी, फणी, चंद्र, तारे, सूर्य, असे ग्रह तयार करून ते तळून मडक्यात ठेवले जातात. नंतर परंपरेनुसार विधिवत पूजन केले जाते. सोबतच बाजारातून ज्वारीची धांडे झोपडी, आठवी मातेची प्रतिमा असलेला कागद, त्यावर बोर, आवळा, शिंगाडा अशाप्रकारे फळांसहीत सकट खरेदी करून आणले जाते. त्या कागदाची पूजा करून आरती झाल्यानंतर घरातील सर्व कुटुंबीय आठवी मातेकडे आपापल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी कामना करतात. ही पद्धत अनेकांकडे दिसून येते, असे पाचखेडे महाराज सांगतात.
advertisement
भक्तांची ही आहे भावना
आठवी देवी त्वचारोग दूर करते असा समज आहे. कांजण्या, गोवर, देवी, शिरणी अशाप्रकारे त्वचारोग कोणाला उद्भवल्यास आठवी देवीकडे क्षमा मागून देवीची पूजा केली जाते. देवी समोर नतमस्तक होऊन आपली प्रकृती ठीक करण्याची मनोकामना केली जाते. आपल्या कुटुंबावर कुठलेही रोगाचं आजारांचा संक्रमण होऊ देऊ नये आणि घरात सुख संपत्ती नांदावी यासाठी प्रार्थना केली जाते, असे हेमंतशास्त्री सांगतात.
advertisement
आंबिलीला विशेष महत्त्व
आठवी पूजनाच्या दिवशी आंबिलीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. आठवीच्या दिवशी म्हणजेच कलाष्टमीच्या दिवशी सायंकाळी देवासमोर पाटावर कोरा कापड टाकून त्यावर आठवीची पूजा मांडली जाते. सोबतच घरी ज्वारीची आंबील शिजवली जाते. काही ठिकाणी गोड तर काही घरी फोडणीची आंबील केली जाते. तसेच हा नैवेद्य देवी जवळ ठेवला जातो. गंजात देवीजवळ ठेवलेली ती आंबील काही घरी आठवी पूजन झाल्यानंतर सेवन केली जाते. तर काही घरी दुसऱ्या दिवशी सकाळी आंबील खाऊन उपवास सोडण्याची परंपरा आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
November 03, 2023 7:57 AM IST