भंडाऱ्याची मुक्त उधळण अन् चांगभलंचा गजर, पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेचं महत्त्व
- Published by:News18 Marathi
Last Updated:
पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्रासह परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.
कोल्हापूर, 2 नोव्हेंबर: कोल्हापूरच्या पट्टणकडोली गावातील यात्रा हे बऱ्याच जणांचे आकर्षण असते. दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात म्हणजेच साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात मृग नक्षत्रावर भरणारी ही विठ्ठल बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असते. संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश या राज्यांतून लाखो भाविक या यात्रेसाठी येत असतात. खारीक, खोबरे, भंडाऱ्याची मुक्त उधळण, धनगरी ढोलांचा निनाद, पावा कैताळ यांचे सूर, सोबतच अखंड होणारा चांगभलंचा गजर असे सगळे वातावरण दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पाहायला मिळाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात श्री विठ्ठल-बिरदेव देवाची ही यात्रा भरत असते. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी सुमारे आठ ते 10 लाख भाविक पट्टणकोडोलीमध्ये दाखल होत असतात. यावेळी पिवळ्या भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे पट्टणकोडोली गावाला जणू सोन्याची झळाळी आल्याचे चित्र पाहायला मिळते. तर फरांडे बाबांकडून केली जाणारी भाकणूक हे या यात्रेत मुख्य आकर्षण असते.
advertisement
काय आहे यात्रेचे महत्त्व?
विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू आणि बिरदेव म्हणजेच वीरभद्राचा किंवा साक्षात शिवाचा अवतार मानला जातो. या दोन्ही दैवतांनी अनेक ठिकाणी भक्तांचा उद्धार केला. त्यानंतर विठ्ठल बिरदेव हे पट्टणकोडोली गावी विराजमान झाले. पट्टणकोडोली क्षेत्राचा महिमा वाढावा, आपल्या कृपेची पाखर भक्तांवर राहावी यासाठी म्हणून विठ्ठल बिरदेव यांनीच हा महोत्सव सुरू केला. या महोत्सवात एका सत्शील भक्ताकडून भविष्यकाळातील घटनांचे सूचक भविष्य करवून घेण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी अंजन गावच्या वाघमोडे घराण्याला त्यांनी हा सन्मान दिला. आजही खेलोबा वाघमोडे यांचे वंशज म्हणजेच फरांडे बाबा आजही 21 दिवसांचा प्रदीर्घ उपवास करून पट्टणकोडोलीला या यात्रेसाठी येत असल्याचे मंदिर अभ्यासक ॲड. प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.
advertisement
काय असते फरांडे बाबांचे हेडाम नृत्य?
या विठ्ठल बिरदेव यात्रेमध्ये फरांडे बाबांचे हेडाम नृत्य पहायला देखील बरेच जण येत असतात. खरंतर पट्टणकोडोलीत येऊनही खेलोबा वाघमोडे यांना देवाची भेट घडत नव्हती. म्हणून खेलोबा यांनी स्वतःच्या शरीरावर तलवारीचे घाव घालून देह संपवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. परंतु देवाच्या सामर्थ्याने असे घडले नाही. उलट देवांनीच आपला दुसरा प्रिय भक्त असलेल्या महालिंगरायाची आठवण म्हणून खेलोबाच्या हातात आणखी एक खड्ग दिले. अशा दुहेरी खड्गांनी खेलोबाचा खेळ सुरू झाला. याचाच जगभरात सर्वत्र हेडाम नृत्य म्हणून लौकिक आहे, असेही मालेकर यांनी सांगितले.
advertisement
दरवर्षी अशी भरते यात्रा
दरवर्षी अश्विन महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षातील मृग नक्षत्राच्या दिवशी सकाळी देवाला नैवेद्य दाखवला जातो. तर कर्नाटकातील भक्त विजापूरचे बाशिंग बांधतात आणि दुपारी बारानंतर खेलोबाचे वंशज अर्थात फरांडे बाबा हेडाम खेळत देवाच्या मंडपामध्ये येतात. याठिकाणी परंपरेप्रमाणे फरांडे बाबांच्या भाकणुकीचा सोहळा पार पडतो. संपूर्ण तीन दिवसांच्या या यात्रेमध्ये विठ्ठल बिरदेव यांची पाच वेळेला पालखी निघते. या यात्रेसाठी संपूर्ण पट्टणकोडोली परिसर भक्तांनी गजबज होऊन गेलेला असतो. यात्रेवेळी या ठिकाणी भरणारी घोंगड्यांची बाजारपेठ देखील विशेष प्रसिद्ध आहे.
advertisement
यात्रेतील भाकणूक म्हणजे काय?
जेव्हा खेलोबा वाघमोडे हे विठ्ठल बिरदेव यांच्या भेटीला आले, तेव्हा त्यांच्या तोंडून देवाने काही शब्द पेरले. भविष्यकाळात घडणाऱ्या काही घटनांचे सूचक भविष्य यालाच भाकणूक असे म्हणतात. या भाकणुकीमध्ये साधरण वर्षभर येणारी पिके, सामाजिक आणि राजकीय वातावरण, एकूणच आर्थिक वातावरण आणि या सगळ्यांशी निगडित देवांचा कृपाशीर्वाद अशा गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे ही भाकणूक ऐकायलाही अनेकजण याठिकाणी येत असतात.
advertisement
यंदाची फरांडेबाबांची भाकणूक अशी..
यंदाही पार पडलेल्या फरांडेबाबा यांच्या भाकणुकीमध्ये येत्या वर्षाभरात होणाऱ्या काही गोष्टींचा अंदाज वर्तविला आहे. राजकारणात प्रंचड अस्वस्थता असेल गोंधळ होऊन प्रचंड उलथापालथ होईल. तसेच भगव्याच राज्य येईल. बळीराजाला सुखाचे दिवस येतील. महागाई शिगेला पोहोचेल. समान नागरी कायद्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल होईल. जगात भारत देश महासत्ता बनेल. भारतीय संशोधन जगात कौतुकास पात्र होईल. त्याचबरोबर कोणी कोणाचे विश्वासू राहणार नाही, रोगराई सर्वसामान्य असेल, कांबळ्याचे महत्त्व जगात वाढून सेवेकऱ्यास पुण्य प्राप्त होईल, अशी भाकीते या भाकणुकीत करण्यात आली आहेत.
advertisement
दरम्यान, अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील, सोशल मीडियावर 'यल्लो फेस्टीव्हल किंवा हल्दी फेस्टिवल' अशा नावांनी प्रसिद्ध असलेल्या या पट्टणकोडोलीच्या यात्रेला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 02, 2023 1:51 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
भंडाऱ्याची मुक्त उधळण अन् चांगभलंचा गजर, पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेचं महत्त्व