कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा संपन्न, 'आई राजा उदो उदो'चा जयघोष
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
Shri Tuljabhavani Temple: भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या गर्दीत तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा पहाटे उत्साहात संपन्न झाला. याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : देशभरात मागील 10 दिवस अत्यंत प्रसन्न आणि उत्साहाचे होते. ठिकठिकाणी नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. तब्बल 21 वर्षांनंतर हा 10 दिवसांचा नवरात्रोत्सव होता. यानिमित्तानं अख्खी तुळजापूर नगरी दुमदुमून निघाली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा प्रचंड उत्साहात, थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. कुंकवाची उधळण आणि 'आई राजा उदो उदो' अशा गजरात आई तुळजाभवानी मातेची पलंग पालखी तुळजापुरात दाखल झाली. आईचं माहेर मानलं जाणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रविवारी भल्या पहाटे मोठी गर्दी केली होती.
advertisement
तुळजाभवानी देवीची चल मूर्ती असल्यानं ती सिंहासन सोडून सीमोल्लंघनासाठी भाविकांसोबत मंदिराबाहेर येते. त्यानुसार पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आई तुळजाभवानी सीमोल्लंघनासाठी मंदिराबाहेर आली. यावेळी भाविकांनी 'आई राजा उदो उदो' असा जयघोष केला.
भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या गर्दीत तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा पहाटे उत्साहात संपन्न झाला. याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. शहरभर पलंग पालखीची मिरवणूक काढून मध्यरात्री तुळजाभवानी मातेचा दुग्धाभिषेक झाला. त्यानंतर तुळजाभवानी मातेस 108 साड्यांची दिंड बांधण्यात आली.
advertisement
सीमोल्लंघन सोहळ्यानंतर आई तुळजाभवानी माता 5 दिवसांची मंचकी निद्रा घेते. या निद्रेला 'श्रमनिद्रा' असं म्हणतात. देवीची मूर्ती पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. यावेळी इजा होऊ नये म्हणून देवीला 108 साड्या परिधान करण्यात येतात.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
October 13, 2024 2:17 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा संपन्न, 'आई राजा उदो उदो'चा जयघोष