आई राजा उदो उदो..! तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ, नवरात्र उत्सवापूर्वीची प्रथा काय?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
तुळजाभवानी देवीचा नवरात्री उत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. ही परंपरा नेमकी काय आहे? जाणून घेऊ.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव: श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच्या देवीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी सायंकाळी प्रारंभ झाला. 9 दिवसांची मंचकी निद्रा घेऊन 3 ऑक्टोबरच्या पहाटे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 12 वाजता घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती मंदिरातील पुजारी अमरराजे कदम यांनी दिली.
advertisement
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीला ओळखलं जातं. याठिकाणी संपूर्ण जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नवरात्रीत तुळजापूर येथे मोठा उत्सव असतो. त्यामुळे या काळात भाविकांची मोठी गर्दी याठिकाणी असते.
advertisement
नवरात्री उत्सवास 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी पहाटे श्री तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आल्यानंतर कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होईल.
advertisement
वर्षभरात 3 वेळा मंचकी निद्रा
तुळजाभवानी मातेची वर्षभरात 3 वेळा मंचकी निद्रा असते. नवरात्र महोत्सवाच्या पूर्वीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. या निद्रेला 'घोर' निद्रा असे म्हटले जाते. तर सिमोल्लंघनानंतरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला 'श्रमनिद्रा' असे म्हटले जाते. 2024 चा शारदीय नवरात्र महोत्सव 3 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे, असे यावेळी पुजारी कदम यांनी सांगितले.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
September 25, 2024 9:01 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
आई राजा उदो उदो..! तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ, नवरात्र उत्सवापूर्वीची प्रथा काय?