उत्तरायणात नदीच्या संगमावर का करतात पवित्र स्नान? हिंदू धर्मातील महत्त्व माहितीये का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हिंदू धर्मात उत्तरायण काळात नदीच्या संगमावर पवित्र स्नान, देवतांचे दर्शन आणि दानधर्म केले जातात.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : नवीन वर्षाची सुरुवात झाली की हिंदू संस्कृतीतील पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. या सणानंतर प्रत्येक नदीच्या संगमावर असणाऱ्या मंदिरांमध्ये पुढच्या काही दिवसांकरिता धार्मिक विधी आणि पुण्य स्नान देखील संपन्न होत असतात. मात्र या स्नान विधीला आणि या धार्मिक कार्यांना या काळात इतके महत्त्व का आहे याबाबत बऱ्याच जणांना ठाऊक नसते. त्यामुळेच कोल्हापुरातील मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
भारतीय संस्कृतीतील बरेचसे सण हे पंचांगावर, चंद्राच्या कलांवर तीथींवर अवलंबून असतात. मात्र मकर संक्रांत हा सण मात्र तारखेवर अवलंबून आणि सूर्याच्या परिभ्रमणाशी संबंधित असणारा सण आहे. या सणाच्या नावातच मकर राशीचा उल्लेख आहे. खरंतर उत्तरायण आणि दक्षिणायन अशी सूर्याच्या परिभ्रमणाची दोन परिमाणे आहेत. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा उत्तरायणाला प्रारंभ होतो. हा उत्तरायण म्हणजे अतिशय पवित्र काळ समजला जातो. असे उमाकांत राणिंगा यांनी सांगितले आहे.
advertisement
का असते उत्तरायणात संगमावरील स्नान शुभ?
खरंतर देवतांची रात्र म्हणजेच दक्षिणायन अशी संकल्पना आपल्याला पुराणात आढळते. तर उत्तरायणाला देवतांचा दिवस सुरू होतो. भौगलिकदृष्ट्या विचार केला तर पृथ्वीवर देखील उत्तर गोलार्धात ध्रुवीय प्रदेशात 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. त्यातील दिवसाचा प्रारंभ म्हणजेच उत्तरायण प्रारंभ होय. याच सर्व कारणांमुळे उत्तरायणाला पुण्यपर्व मानले जाते. या काळात नदीच्या संगमावर स्नान करावे, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळेच भारतात ज्या ज्या ठिकाणी नदीच्या संगमावर देवस्थाने आहेत, त्या ठिकाणी भक्त या काळात आवर्जून पवित्र स्नान, पूजापाठ, दानधर्म करतात.
advertisement
भारतात सर्वत्र साजरा होत असतो हा काळ
मकर संक्रांतीपासून सुरु होणाऱ्या उत्तरायणात नदीच्या संगमावर स्नान, देवतेचे दर्शन आदींमुळे पुढे येणाऱ्या वर्षाची पवित्र सुरुवात या पुण्यपूर्व काळात केली जाते. दक्षिण भारतात कुंभकोनम, मदुराई, उत्तरेतील प्रयाग याप्रमाणेच नदीचे संगम असणाऱ्या इतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या पर्वकाळात भाविकांची मोठी गर्दी होत असते, अशी माहिती देखील राणिंगा यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान, यापुढे आता उत्तरायणाच्या सुरुवातीला नदीच्या संगमावर पवित्र स्नान करताना किंवा मंदिरात दर्शन घेताना आपल्याला या गोष्टींचे महत्त्व नक्कीच माहीत असेल. त्यामुळे या काळात असे धार्मिक विधी करून आपले येणारे वर्ष शुभ करता येईल, असेही राणिंगा यांनी स्पष्ट केले आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
January 18, 2024 10:36 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
उत्तरायणात नदीच्या संगमावर का करतात पवित्र स्नान? हिंदू धर्मातील महत्त्व माहितीये का?