दख्खनचा राजा जोतिबाचं दर्शन पुन्हा सुरू, मंदिरात भाविकांच्या रांगा, पण का होतं बंद?
- Reported by:Niranjan Kamat
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jotiba Darshan: अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत मानलं जाणाऱ्या जोतिबाचं दर्शन गेल्या 4 दिवसांपासून बंद होतं. आजपासून भाविकांसाठी पुन्हा दर्शन सुरू करण्यात आलं.
कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचं दर्शन 4 दिवस बंद होतं. आज शनिवारी सकाळपासून भाविकांसाठी पुन्हा दर्शन सुरू करण्यात आलं. श्री जोतिबा मूर्तीवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी जोतिबा देवाच्या मूर्तीची श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठापना करून भाविकांसाठी मुळ मूर्तीचे दर्शन खुले करण्यात आले. त्यांनंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
जोतिबा मंदिरातील मुख्य मूर्तिवर रासायनिक संवर्धनाची प्रक्रिया करण्यासाठी मंगळवारपासून 4 दिवस श्रींचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. आज ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर आज सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी जोतिबा देवाच्या मूर्तीची विधीवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीक्षेत्र आडी देवस्थानचे परमात्मराज महाराज आणि प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे उपस्थित होते. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
advertisement
11 एकर जमीन, तब्बल 35 टन रांगोळी, साडेचार लाख स्क्वेअर फुटांमध्ये साकारली छत्रपती शिवरायांची रांगोळी
यावेळी आरती, मंत्रपठन, पुष्पवृष्टी करून शंख, घंटानाद करण्यात आला. चांगभलंचा गजर करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. मूळ मूर्तीचे दर्शन चार दिवस बंद ठेवल्याने आज दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली. भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. मंदिरात महिलांनी सामुहिक मंत्रपठन केले. मंदिराच्या सभोवती रांगोळी काढण्यात आली होती. त्यांचबरोबर मंडपाची आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती.
advertisement
जोतिबा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा
“जोतिबा हे जागृत देवस्थान असून श्री जोतिबा देवाचे महात्म्य वाढत आहे. पुढील काळातही जोतिबा तीर्थ क्षेत्राचा अधिकाधिक विकास व्हावा,” अशी मनोकामना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आडी देवस्थानचे परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केली.
मूर्ती संवर्धन कामावस समाधानी
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, “रासायनिक मूर्ती संवर्धनाचे काम पुरातत्व विभाग, श्रीपुजक आणि जानकार लोकांच्या मार्गदर्शन आणि नियमानुसार झाले असून झालेल्या कामाबद्दल समाधानी आहे.” तसेच आता भाविकांनां श्री जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी कसलीही अडचण नसल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Jan 25, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/Temples/
दख्खनचा राजा जोतिबाचं दर्शन पुन्हा सुरू, मंदिरात भाविकांच्या रांगा, पण का होतं बंद?










