महाराष्ट्रातल्या या मंदिराचा 898 वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात, आश्चर्यकारक माहिती समोर

Last Updated:

हा शिलालेख 12व्या शतकातील असून यात कलचुरी बिज्जणदेव द्वितीय याचा महत्त्वाचा उल्लेख आला आहे. शिलालेख वाचनामुळे सागरेश्वर मंदिराचा सुमारे 898 वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात आला आहे. 

सागरेश्वर येथील शिलालेखाचे वाचन करताना इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे व अतुल मुळीक 
सागरेश्वर येथील शिलालेखाचे वाचन करताना इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे व अतुल मुळीक 
प्रीती निकम, प्रतिनिधी
सांगली : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये देवराष्ट्रे गावात प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात जवळपास 51 मंदिरे असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. मंदिराच्या आवारात असणाऱ्या अनेक वर्षे अपरिचित राहिलेल्या शिलालेखाची उकल आणि त्याचे वाचन इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे आणि अतुल मुळीक यांनी केले. हा शिलालेख 12व्या शतकातील असून यात कलचुरी बिज्जणदेव द्वितीय याचा महत्त्वाचा उल्लेख आला आहे. शिलालेख वाचनामुळे सागरेश्वर मंदिराचा सुमारे 898 वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात आला आहे.
advertisement
असा आहे शिलालेख
श्री सागरेश्वर मंदिराच्या डाव्याभिंतीला लागून कुंडाजवळ दोन शिलालेख आहेत. यामधील एक दुर्बोध झाला असून दुसरा ही खुप खराब झाला आहे. सदर शिलालेख 87 सेंमी उभा असून 41 सेंमी रुंद आहे. तर 18 सेंमी जाड आहे. शिलालेख एकूण सहा ओळींचा आहे. सर्वात वर सूर्य, चंद्र आणि शिवपिंडी, नांगर कोरले आहेत. त्याजवळ देवाचे नाव कोरले आहे. तर सर्वात खाली गाय तसेच राजाचे राज्य चिन्ह तलवार कोरण्यात आली आहे.
advertisement
शिलालेख वाचन 
1. क्षनकुर देवर्गे
2. स्वस्ती स्री सकु १०४९ पलवंगो
3. संवसरे न || स्री वेज्यानादेव वीजय रज्या
4. कऱ्हाठ देसी थान असु देस रु|| [मगदी] ||
5. देव दत्त || [ग्नोक नं कु मी ताडी जी] ||
advertisement
6. प क र व देत्व फेडी तेय गढोव बापा
[कंसातील वाचन अस्पष्ट व दुर्बोध आहे]
शिलालेखाचा अर्थ 
सर्वांत वर 'शंकर देवर्गे' असा येथील देवाचा उल्लेख आला आहे. म्हणजे हे शंकर देवाचे मंदिर आहे आणि हे दान येथील या देवतेस दिले आहे. त्यानंतर 'स्वस्ती श्री' हे मंगल वचन आलेले आहे. त्यानंतर शके 1049 लवंग संवत्सरेमध्ये बिज्जण देवाचे विजयी राज्य कऱ्हाट देशावर असताना येथील मंदिराला काही दान दिले आहे. देवाला दिलेले दान जो कोणी फेडेल म्हणजेच अव्हहेर करेल त्याचा पिता गाढव असेल. शिलालेख बराच जीर्ण असल्याने काही मजकुर वाचता येत नाही. वरील शक आणि संवत्सर हे 15 मार्च 1127 ते 1 मार्च 1128 या काळात होते. म्हणजेच हा शिलालेख इ. स. 1127 ते इ. स. 1128 सालातील आहे.
advertisement
करहाड तसेच कराहाड देश आणि कलचुरी बिज्जन द्वितीय  
शिलाहार नृपती मारसिंग (इ. स. 1050-1075) हा करहाटपती (करहाट देशाचा अधिपती) होता. त्याने तिची कन्या चंद्रलेखा हीचा स्वयंवर कराड येथेच ठेवला होता.
वा. वि. मिराशी यांच्या मते हा स्वयंवर विवाह झाल्यावर लवकरच शिलाहार यांना आपली राजधानी कराडून कोल्हापुरास हलवावी लागली. नंतरच्या काळात करहाट येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि शष्ठ विक्रमादित्यचा मांडलीक कलचुरी जोगम हे काही काळ राज्य करीत होते असे उल्लेख आढळतात. या कलचुरी जोगमची मुलगी सावल देवी ही चालुक्य शष्ठ विक्रमादित्य यास दिली होती. तसेच द्वितीय बिज्जल कलचुरी हा जोगम कलचुरीचा नातू आहे. तसेच त्याचे सहावा विक्रमादित्य याच्याशी जवळचे कौटुंबिक संबंध होते. जसे कराड प्रांतावरून जोगम राज्य करत होता, त्याचप्रमाणे पुढे चालून त्याचा नातू आणि चालुक्यांचा संबंधित नातेवाईक म्हणून बिज्जन द्वितीय हा या प्रांतावरून राज्यकारभार करत असावा. हे या इ. स. 1127 च्या देवराष्ट्रे शिलालेखातून स्पष्ट होते. बिज्जन हा चालुक्यांचा सेनापती तर होताच तसेच प्रचंड शक्तिशाली मांडलीक पण होता. त्याने वेळोवेळी बंड पुकारल्याचे दिसते. त्यातच या शिलालेखात त्याचे हे विजयी राज्य असल्याचे म्हटले आहे. यावरून त्याच्या चक्रवर्ती होण्यासाठीच्या प्रबळ इच्छा दिसून येतात. 'तृतीय' सोमेश्वरच्या काळातच कराड 4000 चा राज्यकारभार पाहत असलेला चालुक्यांचा सामंत असलेला बिज्जल कलचुरी हा हळूहळू आपले प्रस्थ वाढवत होता. असा संदर्भ सातारा गॅझेटमध्ये देण्यात आला आहे.
advertisement
कलचुरी बिज्जन द्वितीय याच्या कारकिर्दीतील पहिला शिलालेख
आजवर कलचुरी बिज्जन द्वितीयचे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात अनेक शिलालेख सापडले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील औराद येथे आढळलेला सोमेश्वर तृतीय याच्या कारकीर्दीतील नवव्या राज्यवर्षी इ. स. 1135 मध्ये महामंडलेश्वर कलचुरी बिज्जन द्वितीय त्याचा अधिकारी याने अनेक विजय कालीन राज्यांवर मिळवल्याचे उल्लेख मिळतात. तसेच इ. स. 1142 च्या एका शिलालेखावरून बिज्जन करहाटक 4000 या विभागावरून राज्य करत असल्याचे सांगितले आहे. पूर्वी सापडलेल्या शिलालेखाच्या अगोदरच या देवराष्ट्रे शिलालेखावरून कलचुरी बिज्जन द्वितीय हा कराड प्रांतावरून इ. स. 1127 सालापूर्वीच राज्य करत होता हे स्पष्ट होते. तसेच शिलालेख नमूद केलेल्या काळात तृतीय सोमेश्वर कराड 4000 चा राज्यकारभार बघत होता. पण सोमेश्वराचा सामंत कलचुरी बिज्जन द्वितीय स्वतःचे राज्य म्हणत असल्याने त्याच्या कारकिर्दीतला पहिला शिलालेख तसेच त्याची महत्त्वाकांक्षा दर्शविणारा महत्वपूर्ण असा देवराष्ट्रे शिलालेख म्हणावा लागेल, अशी माहिती इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे आणि अतुल मुळीक यांनी दिली.
advertisement
यावेळी शिलालेख वाचनासाठी विक्रांत मंडपे तसेच राजेश जाधव, देवस्थानचे सागर गुरव, प्रा. अरुण घोडके, हर्षल केसरकर यांचे सहकार्य लाभले आहे.
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
महाराष्ट्रातल्या या मंदिराचा 898 वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात, आश्चर्यकारक माहिती समोर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement