KKR vs RR: अजिंक्यची एक आयडिया, वैभवने गेम फिरवला, RR च्या तोंडातला घास KKR ने काढून घेतला!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
KKR vs RR: कोलकात्याने राजस्थानवर एका धावाने सनसनाटी विजय मिळवून अंतिम ४ मध्ये जाण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यातील सामना अखेरच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना शुभम दुबेला मोठा फटका खेळण्यात अपयश आले. त्यामुळे कोलकात्याने राजस्थानवर एक धावेने सनसनाटी विजय मिळवून अंतिम ४ मध्ये जाण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.
राजस्थानचा कर्णधार रियान परागने कोलकात्याच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. मोईन अलीच्या एका षटकात तर रियान परागने लागोपाठ पाच षटकार खेचले. रियानने ४५ चेंडूत ९५ धावा केल्या. त्याचे रंगरुप पाहता राजस्थान सामना जिंकणार असे वाटत होते. पण मोक्याच्या क्षणी हर्षित राणाने त्याचा अडसर दूर करून कोलकात्याला पुन्हा सामन्यात आणले. अखेरच्या षटकात २२ धावांच्या बचावाची वेळ असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने चेंडू सोपवला युवा गोलंदाज वैभव अरोराच्या हाती!
advertisement
६ चेंडू २२ धावा, अखेरच्या षटकातील थरार!
षटकातील पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरने ऑफला उत्तम फटका मारला. चार धावांची अपेक्षा असताना युवा खेळाडू रिंकु सिंगने तंदुरुस्तीचा अप्रतिम नमुना दाखवून संघासाठी दोन धावा वाचवल्या. पहिल्या चेंडूवर दोन धावा निघालेल्या असताना उर्वरित पाच चेंडूत २० धावांची आवश्यकता होती. वैभवने दुसरा चेंडू आऊटसाईड ऑफला यॉर्कर टाकून जोफ्राला अनुत्तरित केले. त्या चेंडूवर एक धाव निघाली. तिसऱ्या चेंडूवर शुभम दुबेने वैभवला गगनचुंबी षटकार खेचून आपल्यातील दम दाखवून दिला. चौथ्या चेंडूवर पुन्हा शुभमने वैभवला अप्रतिम चौकार लगावला. यावर अजिंक्य रहाणे चांगलाच संतापला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून त्याला वैभवचा कमालीचा राग आलेला होता, हे दिसत होते.
advertisement
आता दोन चेंडूत नऊ धावांची आवश्यकता होती. परंतु यॉर्करच्या नादात वैभवने चूक केली. त्याच्याकडून फुलटॉस चेंडू पडला. वैभवला तेच हवे होते. वैभवने फुलटॉस चेंडू अगदी वाऱ्याच्या वेगाने प्रेक्षकांमध्ये भिरकावला. शुभमच्या आतिषबाजीने कोलकात्याच्या प्रेक्षकांना देखील चेव चढला. दुसरीकडे वैभव मात्र चांगलाच दबावाखाली आला होता.
रहाणेने त्वरित गोलंदाजी मार्कजवळ जाऊन वैभवला समजावले. आऊटसाईड ऑफला यॉर्कर टाक, असा सल्ला रहाणेने वैभवला दिला. राजस्थानला अखेरच्या चेंडूवर तीन धावा हव्या असताना वैभवने रहाणेचा सल्ला अंतिम मानून तोच चेंडू टाकला. शुभमने अखेरचा चेंडू पूर्ण ताकदीने मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चौकार अथवा षटकार लगावण्यात शुभमला अपयश आले.त्याने लाँग ऑफला फटका मारला, परंतु दुसरी धाव घेताना रिंकूने वैभवकडे अगदी व्यवस्थित, शांतपणे चेंडू फेकून त्याला धावबाद केले. अखेर कोलकात्याने एका धावाने राजस्थानवर सनसनाटी विजय मिळवला.
advertisement
आऊटसाईड ऑफला यॉर्कर टाक, हाच रहाणेचा सल्ला प्रमाण मानून वैभवने अखेरचा चेंडू टाकला. षटकात दोन चेंडू त्याने यॉर्कर टाकले. त्याचा कोलकात्याला फायदा झाला आणि एका धावेने का होईना पण कोलकात्याचा विजय झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 04, 2025 8:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR vs RR: अजिंक्यची एक आयडिया, वैभवने गेम फिरवला, RR च्या तोंडातला घास KKR ने काढून घेतला!