IPL 2026 : पैसे संपल्याने उपाशी रात्र काढली, वडिलांनी कर्ज काढलं, आयपीएल लिलावात मिळाले 14 कोटी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडू करोडपती झाले. 19 वर्षांचा कार्तिक शर्माही त्यातलाच एक. पाच वेळची आयपीएल चॅम्पियन सीएसकेने कार्तिक शर्माला तब्बल 14.20 कोटी रुपये देऊन विकत घेतलं.
मुंबई : आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये अनेक युवा खेळाडू करोडपती झाले. 19 वर्षांचा कार्तिक शर्माही त्यातलाच एक. पाच वेळची आयपीएल चॅम्पियन सीएसकेने कार्तिक शर्माला तब्बल 14.20 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. आयपीएल इतिहासातला कार्तिक शर्मा हा सर्वाधिक रक्कम मिळालेला अनकॅप्ड भारतीय खेळाडू ठरला आहे. सीएसकेने खरेदी केल्यानंतर कार्तिक शर्मा भावुक झाला.
मूळचा राजस्थानचा असलेल्या विकेट कीपर-बॅटर कार्तिक शर्माने लिलावानंतर जिओहॉटस्टारला मुलाखत दिली. 'जेव्हा बोली लागली तेव्हा, आपल्यावर कुणी बोली लावेल का नाही, याची मला भीती वाटत होती, पण बोली जशी वाढत गेली, तसं मला रडू यायला लागलं. बोली संपल्यानंतर माझे अश्रू अनावर झाले. मी आनंदाने भारावून गेलो. हे सगळं शब्दात कसं व्यक्त करायचं, हे मला माहिती नाही', असं कार्तिक शर्मा म्हणाला.
advertisement
रात्र उपाशी काढली
कार्तिकच्या वडिलांनी मुलाला क्रिकेटपटू बनवण्यासाठी केलेला संघर्ष सांगितला. कार्तिक ग्वालियरमध्ये स्पर्धा खेळायला गेला तेव्हा त्याची टीम पराभूत होऊन स्पर्धेबाहेर होईल, त्यामुळे परत यायला चार-पाच दिवस लागतील, असं वाटलं होतं. पण कार्तिक आणि त्याच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी केली आणि ते फायनलमध्ये पोहोचले. कार्तिक आणि त्याच्या टीमकडे चार-पाच दिवस पुरतील एवढेच पैसे होते. पैसे संपल्यानंतर कार्तिक आणि त्याच्या टीमला हॉटेल सोडावं लागलं आणि रात्रीच्या निवाऱ्यात राहावं लागलं. यानंतर टीमने फायनल जिंकली.
advertisement
वडिलांनी कर्ज काढलं
कार्तिकला क्रिकेटपटू बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी कर्ज काढलं आणि एक बॉलिंग मशीन खरेदी केली. या बॉलिंग मशीनमुळे कार्तिकला सराव करायला मदत झाली.
कार्तिकसाठी बिडिंग वॉर
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने कार्तिकवर बोली लावण्यास सुरुवात केली, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सची एन्ट्री झाली. पण मुंबई लवकरच यातून बाहेर पडली, त्यानंतर कोलकाता आणि लखनऊने कार्तिकची किंमत 2.80 कोटींपर्यंत आणली. त्यानंतरच चेन्नईने बोली लावायला सुरूवात केली. सनरायझर्स हैदराबादही नंतर त्यात सामील झाले, पण चेन्नईने शेवटी 14.20 कोटी रुपयांमध्ये कार्तिकला टीममध्ये घेतलं.
advertisement
धोनीसोबत खेळण्यास कार्तिक उत्सुक
कार्तिक म्हणाला की तो महेंद्रसिंग धोनीसोबत खेळण्यास उत्सुक आहे. कार्तिकने त्याच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे आभार देखील व्यक्त केले ज्यांनी त्याला इथपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 'माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आणि मित्रांचे विशेष आभार. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी या टप्प्यावर पोहोचलो नसतो असे मला वाटतं. माझे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. सर्वजण आनंद साजरा करत आहेत आणि नाचत आहेत. महेंद्रसिंग धोनीसोबत खेळण्यासाठी आणि त्याच्याकडून शिकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे', असं कार्तिक म्हणाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 11:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : पैसे संपल्याने उपाशी रात्र काढली, वडिलांनी कर्ज काढलं, आयपीएल लिलावात मिळाले 14 कोटी!










