पैसा वसूल! होऊ दे खर्च म्हणत गंभीरने घेतला संघात, सुरुवातीला गंडलेल्या स्टार्कने शेवटी केली कमाल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
आय़पीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिशेल स्टार्कची यंदाच्या हंगामात जास्त चर्चा झाली. सुरुवातीला खराब कामगिरी केलेल्या स्टार्कने अखेरच्या काही सामन्यात कमाल केली.
चेन्नई : यंदाच्या आयपीएल हंगामात केकेआरने लीग फेरीसह नॉकआऊट सामन्यातही जबरदस्त कामगिरी केली. दहा वर्षांनी पुन्हा आय़पीएलचं विजेतेपद पटकावलं. केकेआरचं हे तिसरं विजेतेपद ठरलं. यंदाच्या हंगामात पॉइंट टेबलमध्ये अव्वल राहिलेल्या केकेआरने क्वालिफायरमध्ये सनरायजर्स हैदराबादला हरवलं. त्यानंतर पुन्हा फायनलमध्ये धडक मारलेल्या हैदराबादवर सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सनरायजर्स हैदराबादचा डाव ११३ धावातच आटोपला. त्यांना पूर्ण २० षटकेही फलंदाजी करता आली नाही. तर कोलकाता नाइट रायडर्सने हे आव्हान १०.३ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
आय़पीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिशेल स्टार्कची यंदाच्या हंगामात जास्त चर्चा झाली. सुरुवातीला खराब कामगिरी केलेल्या स्टार्कने अखेरच्या काही सामन्यात कमाल केली. फायनलमध्ये त्याने पहिल्याच षटकात सनरायजर्सचा सलामीवीर अभिषेक शर्माला बाद करून चमक दाखवली. स्टार्कने केकेआरकडून सर्वात कमी धावा दिल्या. तीन षटके टाकताना स्टार्कने १४ धावा देत दोन विकेट घेतल्या.
advertisement
स्पर्धेला सुरुवात होण्याआधी आयपीएलमध्ये केकेआरने गौतम गंभीरला संघाचा मेंटर म्हणून घेतलं. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने दोन वेळा विजेतेपद पटकावलं आहे. यंदाच्या आय़पीएल हंगामात लिलावावेळी गंभीरने ज्या खेळाडूसाठी मोठी रक्कम मोजली त्याने क्वालिफायर आणि फायनलमध्ये जबरदस्त धमाका केला.
फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सनरायजर्स हैदराबादला केकेआरचा स्टार गोलंदाज स्टार्कने पहिल्याच षटकात दणका दिला. सर्वात धोकादायक समजल्या जाणाऱ्या अभिषेक शर्माला त्याने बोल्ड केलं. अभिषेकनंतर राहुल त्रिपाठीची विकेटही स्टार्कने घेतली.
advertisement
मिशेलसाठी गंभीरची बोली
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज असलेल्या मिशेल स्टार्कला संघात घेण्यासाठी गंभीरने वाटेल तितकी रक्कम मोजण्याची तयारी केली होती. स्टार्कसाठी केकेआरने थोडेथोडके नव्हे तर २४.७५ कोटी रुपये मोजले. आय़पीएलच्या इतिहासातली ही सर्वाधिक बोली होती.
हंगामात खराब सुरुवात
view commentsमिशेल स्टार्क यंदाच्या आयपीएल हंगामात फारशी चमक दाखवू शकला नव्हता. तेव्हा त्याच्यावर टीकाही झाली. प्लेऑफच्या जवळ संघ पोहोचताच स्टार्कच्या गोलंदाजीला धार आली. यंदाच्या हंगामात स्टार्कने १४ सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात दोन विकेट घेऊन सनरायजर्स हैदराबादला कमी धावसंख्येवर रोखण्यात त्यानं मोलाची भूमिका पार पाडली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 26, 2024 10:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पैसा वसूल! होऊ दे खर्च म्हणत गंभीरने घेतला संघात, सुरुवातीला गंडलेल्या स्टार्कने शेवटी केली कमाल


