Wushu Competition : अर्रार्रा खतरनाक! महाराष्ट्राच्या लेकींचा जॉर्जियामध्ये विजयाचा डंका; भारतासाठी सुवर्ण-रौप्याची केली कमाई
- Published by:
- local18
- Reported by:Asif Mursal
Last Updated:
जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रावणी घोरपडेने सुवर्ण तर मयुरी वाईंगडेने रौप्यपदक जिंकून भारताचा मान वाढवला.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय व प्रशिक्षकांनी अभिनंदन करत गौरव व्यक्त केला आहे.
जॉर्जियाच्या बटुमी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन तरुणींनी आपल्या दमदार कामगिरीने देशाचा आणि राज्याचा अभिमान उंचावलेला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) येथील विद्यार्थिनी श्रावणी सचिन घोरपडे हिने ५६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तर तिची सहकारी मयुरी शरद वाईंगडे हिने ६५ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली.दोघींच्या यशामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतासाठी सुवर्ण-रौप्याची केली कमाई
ही आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धा १ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या कालावधीत जॉर्जियातील बटुमी येथे पार पडली. जगभरातील अनेक देशांतील नामांकित खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते, भारताचे प्रतिनिधित्व करताना श्रावणी आणि मयुरीने आपल्या कर्तृत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रावणीने ५६ किलो वजनी गटात अपराजित राहून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर मयुरीने ६५ किलो वजनी गटात झुंजार लढत देत रौप्यपदकाची कमाई केली. त्यांच्या या कामगिरीने भारताच्या सुवर्ण कन्यांच्या यादीत नवी नावे झळकली आहेत.
advertisement
या यशाबद्दल दोन्ही खेळाडूंचे कौतुकाचा वर्षाव होत आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे.के. जाधव, उपाध्यक्ष महेंद्र लाड तसेच डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उज्ज्वला पाटील यांनी श्रावणी आणि मयुरीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष आणि आमदार विश्वजीत कदम यांनीही या दोन्ही विद्यार्थिनींच्या परिश्रमांची आणि चिकाटीची प्रशंसा करत त्यांना भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
advertisement
या यशामागे प्रशिक्षक गणेश यादव यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच शारीरिक शिक्षण संचालक संदेश दौंडे, आशिष देशमुख, प्रशांत शेळके आणि अमोल जमदाडे यांनीही त्यांना कठोर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले. या सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळेच महाराष्ट्राच्या या दोन लेकींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली आहे.
क्रीडा क्षेत्रात वुशू हा खेळ शारीरिक चपळता, ताकद शिवाय सहनशीलता आणि तांत्रिक कौशल्य यांचा संगम मानला जातो,अशा या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक पटकावणे ही सोपी गोष्ट नाही. श्रावणी आणि मयुरीने केवळ स्वतःचा नव्हे तर महाविद्यालय, रयत शिक्षण संस्था, महाराष्ट्र आणि अख्ख्या भारताचा मान उंचावला आहे. त्यांच्या यशामुळे राज्यातील अनेक तरुणींना क्रीडाक्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे.
advertisement
या विजयामुळे महाराष्ट्रातील महिला खेळाडूंची क्रीडा क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून, भविष्यातही आंतरराष्ट्रीय पातळीवर अशाच तेजस्वी यशाची मालिका कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 10, 2025 12:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Wushu Competition : अर्रार्रा खतरनाक! महाराष्ट्राच्या लेकींचा जॉर्जियामध्ये विजयाचा डंका; भारतासाठी सुवर्ण-रौप्याची केली कमाई


