Maharashtra Kesari : 'वस्तादा'ने शब्द पाळला! शरद पवारांकडून 'महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीरला मोठी भेट, पठ्ठ्या पुन्हा शड्डू ठोकणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वाघोली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरलेला पैलवान हर्षवर्धन सदगीर याच्या आंतरराष्ट्रीय तयारीसाठी दिलेला शब्द पवार साहेबांनी खरा करून दाखवला आहे.
Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : नुकत्याच वाघोली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी हा पैलवान हर्षवर्धन सदगीर ठरला होता. या विजयानंतर हर्षवर्धन सदगीरने वस्ताद काकासाहेब पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती.या भेटी दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद शरद पवार यांनी हर्षवर्धन सदगीरला सरावासाठी 12 लाख रुपये आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा धनादेश (चेक) देण्याचा शब्द दिला होता.हा शब्द आज शरद पवार यांनी खरा करून दाखवला आहे.
महाराष्ट्राच्या लाल मातीत घाम गाळणाऱ्या पैलवानांना कायमच हक्काचा आधार देणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा कुस्तीवरील आपले अफाट प्रेम सिद्ध केले आहे. नुकतेच वाघोली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मानकरी ठरलेला पैलवान हर्षवर्धन सदगीर याच्या आंतरराष्ट्रीय तयारीसाठी दिलेला शब्द पवार साहेबांनी खरा करून दाखवला आहे. आज एका विशेष भेटीदरम्यान पवार साहेबांनी हर्षवर्धन सदगीरच्या पुढील सरावासाठी 12 लाख रुपये आणि त्याला घडवणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 25 लाख रुपयांचा धनादेश (चेक) प्रत्यक्ष सुपूर्द केला आहे. या कृतीतून 'दिलेला शब्द पाळणारा नेता' अशी आपली ओळख त्यांनी क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी जेव्हा हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली होती, तेव्हा त्याचे कौतुक करताना शरद पवार यांनी त्याच्या पुढील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी दरमहा 50 हजार रुपये याप्रमाणे दोन वर्षांसाठी आर्थिक मदत जाहीर केली होती.हीच 50 हजार रुपयांची दोन वर्षांची बेरीज म्हणजेच 12 लाख रुपयांचा निधी आज अधिकृतरीत्या हर्षवर्धनच्या पुढील तयारीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत.त्याचबरोबर ज्या तालमीत हर्षवर्धनने कुस्तीचे धडे गिरवले आणि अहोरात्र मेहनत घेतली, त्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये नवनवीन आणि अद्ययावत सुविधा निर्माण व्हाव्यात, तिथल्या मॅट्स आणि जिमच्या साहित्यात वाढ व्हावी, जेणेकरून भविष्यात आणखी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडावेत, या व्यापक उद्देशाने संकुलासाठी जाहीर केलेले 25 लाख रुपये देखील चेकच्या स्वरूपात देण्यात आले आहेत.
advertisement
या महत्त्वपूर्ण आणि आनंददायी प्रसंगी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे संस्थापक आणि अर्जुन पुरस्कार विजेते महान कुस्तीगीर काकासाहेब पवार प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करताना पवार साहेबांनी त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचे आणि शिस्तीचे विशेष कौतुक केले.
याप्रसंगी शासकीय कुस्ती प्रशिक्षक (कोच) शिवाजी कोळी आणि कुस्ती क्षेत्राला कायम प्रोत्साहन देणारे आणि मल्लांच्या पाठीशी उभे राहणारे प्रसिद्ध उद्योजक मोहसीन भैया बागवान हे देखील आवर्जून उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा छोटेखानी पण कुस्ती क्षेत्रासाठी अत्यंत ऐतिहासिक असा क्षण ठरला.
advertisement
राजकारणाच्या पलीकडे जाऊन खेळाडूंना आणि विशेषतः कुस्तीला राजाश्रय देण्याची शरद पवार साहेबांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. आज त्यांनी दिलेला हा निधी केवळ पैशांच्या स्वरूपातील मदत नसून, तो एका होतकरू मल्लाच्या स्वप्नांना दिलेली मोठी ताकद आहे. पवार साहेबांनी आपला शब्द खरा केल्याबद्दल आज संपूर्ण महाराष्ट्रातून आणि कुस्ती मल्लविद्या महासंघासह तमाम कुस्तीप्रेमींकडून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 7:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : 'वस्तादा'ने शब्द पाळला! शरद पवारांकडून 'महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीरला मोठी भेट, पठ्ठ्या पुन्हा शड्डू ठोकणार








