पत्नीची हत्या करून पळाला झाला अन् स्वत:ही संपला, डोंबिवलीतील प्रकरणाला वेगळं वळण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
डोंबिवलीत पत्नीचा गळा दाबून खून करून पसार झालेल्या एका पतीने भांडुप येथे लोकलसमोर उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
डोंबिवली: डोंबिवलीत पत्नीचा गळा दाबून खून करून पसार झालेल्या एका पतीने भांडुप येथे लोकलसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोपट दाहिजे (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोपट दाहिजे याने आपली पत्नी ज्योती हिचा खून करून तो पसार झाला होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पोपट विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी सकाळी मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकात एका व्यक्तीने धावत्या लोकलखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.
मोबाइलमुळे उलगडले रहस्य
भांडूप इथं आत्महत्येची नोंद झाल्यानंतर कुर्ला रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृताची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मृत झालेल्या पोपटकडे तुटलेल्या अवस्थेत एक मोबाइल आढळला. हा मोबाइल पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला.
advertisement
रेल्वे पोलिसांनी तातडीने मोबाइल दुरुस्त करणाऱ्या एका दुकानदाराच्या मदतीने त्या फोनचा आयएमईआय (IMEI) नंबर शोधून काढला. कॉल डिटेल्सच्या मदतीने या मोबाइलवर सर्वाधिक वेळा संपर्क साधलेल्या क्रमांकाचा तपास करण्यात आला.
तो क्रमांक ट्रेस करून त्यावर संपर्क साधला असता, तो नंबर मानपाडा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांचा निघाला. यानंतर पोलिसांनी तातडीने खात्री केली असता, भांडुप येथे आत्महत्या करणारा मृत व्यक्ती हाच डोंबिवलीतील खुनाच्या गुन्ह्यात हवा असलेला आरोपी पोपट दाहिजे असल्याची माहिती उघड झाली.
advertisement
बांधकाम मजूर म्हणून करत होता काम
पोपट दाहिजे हा बांधकामाच्या ठिकाणी बिगारी म्हणून काम करत होता. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने आत्महत्येचा मार्ग निवडल्याचे स्पष्ट झाले आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी या घटनेला दुजोरा दिला. खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीने आत्महत्या केल्याने या प्रकरणातील तपासाला एक वेगळे वळण मिळाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 10:25 AM IST









