मुंबईच्या जवळ होणार तिसरं विमानतळ, कधी आणि कुठं? CM फडणवीस यांनी सांगितला प्लॅन
Last Updated:
Mumbai Third Airport : मुंबई आणि नवी मुंबई विमानतळानंतर महाराष्ट्रात तिसरे विमानतळ उभारण्याचा सरकारचा विचार आहे.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळानंतर आता राज्यात तिसरे विमानतळ उभारण्याबाबत राज्य सरकारने विचार सुरू केला आहे. नवी मुंबई विमानतळाला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि भविष्यात वाढणारी प्रवासीसंख्या लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. सुरुवातीला हे तिसरे विमानतळ पालघर जिल्ह्यात उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र आता विरारसह इतर पर्यायांचाही सविस्तर अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
मुंबईजवळ तिसऱ्या विमानतळाची तयारी सुरू
राज्य सरकार विरार आणि पालघर या दोन्ही ठिकाणांचा सखोल अभ्यास करणार आहे. कोणती जागा अधिक सोयीची, वाहतुकीसाठी उपयुक्त आणि दीर्घकालीन विकासासाठी फायदेशीर ठरेल यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. नालासोपारा येथे झालेल्या एका जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जात आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जर विरारमध्ये विमानतळ उभारले गेले तर तो कोस्टल रोडमार्गे प्रस्तावित वाढवण बंदराशी थेट जोडता येईल. त्यामुळे दळणवळण आणि कनेक्टिव्हिटी अधिक सोपी होईल. दुसरीकडे पालघर येथे विमानतळ उभारण्यात आल्यास वसई-विरार परिसर, विमानतळ आणि बंदर यांच्यातील वाहतूक सुविधा अधिक सक्षम केल्या जातील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली असून सरकार हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पालघर आणि वसई-विरार भागात बंदर, विमानतळ आणि बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा उभारून तिसरी मुंबई विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
advertisement
दरम्यान नवी मुंबई विमानतळावर सध्या प्रवाशांना मोबाईल नेटवर्कच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. टर्मिनलच्या आत नेटवर्क जवळजवळ नसल्यामुळे कॉल कट होतात, इंटरनेट चालत नाही आणि ॲपद्वारे होणारे पेमेंटही वारंवार अयशस्वी ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांना संपर्क साधण्यासाठी आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी विमानतळाच्या मोफत वाय-फायवरच अवलंबून राहावे लागत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 4:40 PM IST










