Navi Mumbai News: ‘मोरबे’ धरणाचं पाणी आता दिघ्यापर्यंत, ऐरोली, रबाळे एमआयडीसीची पाणी टंचाई होणार दूर!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नवी मुंबई महानगरपालिकेने दिघ्यासह ऐरोली आणि रबाळे परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा दिला आहे. ऐन उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मिटला आहे.
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेने दिघा ते शिरवणे परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा दिला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणी पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी मोरबे धरणातून थेट आणि नियमित पाणीपुरवठा करण्याच्या योजनेचा श्रीगणेशा केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून रहिवाशांना भेडसावणाऱ्या अनियमित पाणी पुरवठा आणि कमी दाबाच्या समस्या सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या परिसरातील नागरिकांना एमआयडीसी परिसरातील बारवी धरणातून पाणी मिळते, परंतु हा पुरवठा अत्यंत अनियमित राहिला आहे, त्यात वारंवार व्यत्यय येतो आणि काही वेळा तो पूर्णपणे थांबतो, ज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, महापालिकेने सविस्तर टेक्निकल सर्व्हे करण्याकरिता टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सची नियुक्ती केली. त्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने पाण्याचा पुरेसा दाब आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करण्यासाठी पारसिक हिल एमबीआर ते महापे जंक्शनपर्यंत सुमारे 14 किमी लांबीची 1500 मिमी व्यासाची एक स्वतंत्र्य मुख्य जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने वेगाने काम सुरू केले आहे. या योजनेमुळे ऐरोली, दिघा आणि रबाळेसह एमआयडीसी परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळणार आहे.
advertisement
"या प्रकल्पामुळे बाधित भागांना अखंड आणि पुरेसा पाणी पुरवठा सुनिश्चित होईल, ज्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळेल." असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईतील अनेक रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर अनेक वर्षांनंतर या कामाला ही मंजूरी मिळालेली आहे. 3 फेब्रुवारी रोजी आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आधीच सुरू झाले असून, ही प्रणाली पूर्ण झाल्यानंतर पाणी वितरण सुव्यवस्थित होईल, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 9:56 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Navi Mumbai News: ‘मोरबे’ धरणाचं पाणी आता दिघ्यापर्यंत, ऐरोली, रबाळे एमआयडीसीची पाणी टंचाई होणार दूर!









