चीनने दिला मोठा इशारा, भारताच्या बॉर्डरपासून दूर रहा; जीवावर बेतू शकतं, BSF अॅक्शन मोडवर
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India China News: भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपल्या नागरिकांना मोठा इशारा दिला आहे. भारत-नेपाळ सीमेपासून दूर राहा, अन्यथा जीवावर बेतू शकते, असा धक्कादायक इशारा नेपाळमधील चीनी दूतावासाने दिला आहे.
बीजिंग: भारत आणि चीन यांच्यात सध्या तणावपूर्ण संबंध अधिक तीव्र होत चालले आहेत. अशा पार्श्वभूमीवर नेपाळमधील चीनी दूतावासाने एक महत्त्वपूर्ण इशारा जारी करत चीनच्या नागरिकांना भारत-नेपाल सीमेपासून दूर राहण्याचा स्पष्ट सल्ला दिला आहे. दूतावासाच्या सूचनेत सांगितले आहे की, भारतात बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्यास कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
भारतात घुसखोरी करू नका
चीनच्या अधिकृत मुखपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, दूतावासाने नमूद केले आहे की भारत आणि नेपाळने सध्या सीमावर्ती भागांमध्ये गस्त आणि तपासणी अधिक कडक केली आहे. तरीही काही चीनी नागरिक दूतावासाच्या सततच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भारत-नेपाल सीमेकडे जात आहेत. अशा घटनांमध्ये अलीकडेच काही चीनी नागरिकांना भारताच्या सीमा सुरक्षा दलांनी 'बेकायदेशीर प्रवेश' केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
advertisement
खुल्या सीमांचे धोके
दूतावासाने स्पष्ट केले की भारत-नेपाल सीमा ही ‘खुली सीमा’ मानली जाते. जिथे सीमारेषा स्पष्टपणे दर्शवलेली नाही. भारतीय आणि नेपाळी नागरिक वैध ओळखपत्र दाखवून ही सीमा पार करू शकतात. मात्र विदेशी नागरिकांना या सीमेद्वारे भारतात येण्यासाठी वैध व्हिसा असणे अनिवार्य आहे. जर कोणी चीनी नागरिक चुकूनही ही सीमा पार करतो तर त्याला गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
कायदेशीर परिणामांची भीती
चीनने हेही स्पष्ट केले आहे की भारतात बेकायदेशीर प्रवेश करणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन असून त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. एखादा चीनी नागरिक अनवधानानेही भारतात घुसला तरी त्याच्यावर अटक होऊ शकते आणि त्याच्याविरोधात खटला चालवला जाऊ शकतो. या प्रकारामध्ये संबंधित व्यक्तीस 2 ते 8 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. शिवाय मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो. अशा गुन्ह्यांमध्ये जामिनाचीही शक्यता फारच कमी असते.
advertisement
आपत्कालीन परिस्थितीसाठी दूतावासाचा संपर्क
दूतावासाने सर्व नागरिकांना इशारा दिला आहे की त्यांनी भारत-नेपाल सीमेपासून दूर राहावे. तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यांनी त्वरित नेपाळमधील चीनी दूतावासाशी संपर्क साधावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2025 3:57 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
चीनने दिला मोठा इशारा, भारताच्या बॉर्डरपासून दूर रहा; जीवावर बेतू शकतं, BSF अॅक्शन मोडवर