Iran War : इराण झुकला नाही, उलट नडला! अमेरिकन तळांवर हल्ल्यानंतर मांडला ३ अटींचा प्रस्ताव, युद्ध थांबणार?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Iran Israel War: कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती वाढल्याने जागतिक बाजारपेठेत महागाईचा भडका उडाला आहे. युद्ध थांबवण्याचे आवाहन जगभरातून होत असताना आता मोठी बातमी समोर आली आहे.
तेहरान: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती वाढल्याने जागतिक बाजारपेठेत महागाईचा भडका उडाला आहे. युद्ध थांबवण्याचे आवाहन जगभरातून होत असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इराणने पहिल्यांदाच युद्ध थांबवण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. इराणने युद्ध थांबवण्यासाठी तीन प्रमुख अटी जाहीर केल्या आहेत.
जागतिक अर्थव्यवस्थेवर संकटाची टांगती तलवार
स्ट्रेट ऑफ होर्मुज (Strait of Hormuz) मधील वाढत्या तणावामुळे तेल टँकर्सची वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणने पुकारलेल्या या संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर मोठा दबाव आला असून, तज्ज्ञांच्या मते, जर हे युद्ध लवकर थांबले नाही तर महागाईचा मोठा फटका सर्वसामान्य देशांना बसेल. पाकिस्तानमध्ये कामाचे दिवस कमी करण्यात आले असून इंधन दरवाढ जाहीर झाली आहे. तर, भारतातही एलपीजी सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. गॅस तुटवड्याच्या संकटामुळे अनेक ठिकाणी हॉटेल बंद झाली आहेत. तर, काही ठिकाणी चुलीचा पर्याय वापरण्यात येत आहे.
advertisement
काय आहेत इराणच्या ३ अटी?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती देताना राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन म्हणाले की, जर खालील तीन अटी मान्य झाल्या तरच इराण युद्ध थांबवण्याच्या तयारीत आहे. इराणच्या कायदेशीर आणि सार्वभौम अधिकारांना अमेरिकेला मान्य करावे लागेल. त्याशिवाय, या युद्धात इराणचे जे काही नुकसान झाले आहे, त्याची पूर्ण भरपाई केली जावी. भविष्यात इराणवर कोणताही हल्ला होणार नाही, याची ठोस आंतरराष्ट्रीय हमी दिली जावी अशा अटी इराणने ठेवल्या आहेत.
advertisement
अमेरिका आणि इस्रायल इराणच्या या अटींना कसा प्रतिसाद देईल, यावर युद्ध किती लांबणार हे स्पष्ट होईल. इराणच्या अटींना अमेरिका मान्य करेल, याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्ला खामेनींच्या हत्येनंतर इराण झुकेल असा अमेरिका-इस्रायलचा कयास होता. मात्र, खामेंनीच्या हत्येनंतर इराण आणखीच चवताळला. इराणने इस्रायल आणि आखाती देशांमध्ये असणारे अमेरिकेचे तळ उद्धवस्त केले आहेत.
advertisement
रशिया आणि पाकिस्तानशी चर्चा
पेजेशकियन यांनी रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधून प्रादेशिक शांततेसाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी या युद्धाला 'झिओनिस्ट राजवट' (इस्रायल) आणि अमेरिका जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 12, 2026 8:08 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran War : इराण झुकला नाही, उलट नडला! अमेरिकन तळांवर हल्ल्यानंतर मांडला ३ अटींचा प्रस्ताव, युद्ध थांबणार?








