Weird Village : पायाखाली जमीन नाही… तरीही इथे वसलंय गाव! दोरीवर टिकून आहे संपूर्ण आयुष्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हे गाव जगापासून इतकं तुटलेलं आहे की तिथे पोहोचणंही कठीण आहे, पण इथल्या लोकांच्या कलेने मात्र संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मुंबई : आपण सर्कसमध्ये एखाद्या कलाकाराला उंचावर बांधलेल्या दोरीवर चालताना पाहिलं की आपल्या काळजाचा ठोका चुकतो. "जरा जरी पाय घसरला तर?" या विचारानेच आपल्याला घाम फुटतो. पण, जगात एक असं गाव आहे जिथे दोरीवर चालणं हे श्वास घेण्याइतकं नैसर्गिक आहे. इथे एखादी व्यक्ती दोरीवर चालत असेल तर कोणाला आश्चर्य वाटत नाही, कारण इथला प्रत्येक नागरिक हा जन्मजात 'टाईटरोप वॉकर' आहे.
रशियाच्या दागेस्तान प्रांतात, कॉकसस पर्वतांच्या रांगांमध्ये वसलेलं 'त्सोवक्रा-१' (Tsovkra-1) हे गाव. हे गाव जगापासून इतकं तुटलेलं आहे की तिथे पोहोचणंही कठीण आहे, पण इथल्या लोकांच्या कलेने मात्र संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
ही परंपरा नक्की सुरू कशी झाली?
या गावातील दोरीवर चालण्याच्या परंपरेमागे दोन रंजक कथा सांगितल्या जातात. असं म्हणतात की, शेजारच्या डोंगरावर असलेल्या गावातील मुलींशी लग्न करण्यासाठी इथल्या तरुणांना अनेक दिवस प्रवास करावा लागायचा. हा वेळ वाचवण्यासाठी त्यांनी डोंगरदऱ्यांमध्ये दोऱ्या बांधल्या आणि त्यावर चालत जाऊन आपल्या प्रियसीला भेटू लागले. स्वतःचं शौर्य दाखवण्याची ही एक पद्धत बनली.
advertisement
काही गावकरी मात्र या गोष्टीला नाकारतात. त्यांच्या मते, इथला हिवाळा अतिशय क्रूर असायचा. बर्फवृष्टीमुळे रस्ते आणि पूल तुटायचे. अशा वेळी एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाण्यासाठी लोक दोरीचा आधार घ्यायचे. ही गरज पुढे जाऊन एक अजब कला बनली.
रशियाच्या सर्कसचे 'सुपरस्टार्स'
19 व्या शतकापर्यंत या गावाची ओळख आसपासच्या परिसरात पसरली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा सोव्हिएत युनियनमध्ये सर्कस लोकप्रिय झाली, तेव्हा या 'त्सोवक्रा-1' गावाने रशियाला 17 मोठे कलाकार दिले. या कलाकारांनी जगभरातील सर्कस गाजवल्या आणि आपल्या गावाला एक वेगळी ओळख मिळवून दिली.
advertisement
आज या गावाची लोकसंख्या 400 पेक्षाही कमी उरली आहे. मात्र, आजही इथल्या शाळेत लहान मुलांना अभ्यासासोबतच दोरीवर चालण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. एक सेंटीमीटरपेक्षाही पातळ दोरीवर, जमिनीपासून अनेक फूट उंचावर हे लोक एखाद्या जमिनीवर चालल्यासारखे सहज चालतात. वृद्ध माणसंही आजही रोज याचा सराव करतात, कारण त्यांच्यासाठी हे फक्त मनोरंजन नसून त्यांच्या पूर्वजांचा वारसा आहे.
advertisement
त्सोवक्रा-1 हे गाव म्हणजे मानवी साहस आणि जिद्दीचं जिवंत उदाहरण आहे. निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी मानवाने कलेचा आधार कसा घेतला, हे या गावाकडे पाहून समजतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 6:33 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Weird Village : पायाखाली जमीन नाही… तरीही इथे वसलंय गाव! दोरीवर टिकून आहे संपूर्ण आयुष्य







