Beer : भारतातील प्रसिद्ध बिअर बाजारातून अचानक गायब, आता का नाही मिळत?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Beer Brand In India : सर्वात लोकप्रिय बिअर ब्रँड असलेल्या या बिअर ब्रँडला असं काय झालं आहे की शोधल्यानंतरही त्याच्या बाटल्या आता उपलब्ध नाहीत?
काही वर्षांपूर्वी एका बिअरने भारतातील बिअर उद्योगात धुमाकूळ घातला होता. हा एक असा ब्रँड होता ज्याने तरुणांमध्ये बिअरला एक नवीन शैली आणि ओळख दिली. त्याचा रंग, कलरफुल पॅकेजिंग, चिकू मंकीवाला लोगो आणि हलक्या व्हीट बिअरने भारतीय पब कल्चर बदलून टाकलं. जी एकेकाळी कूलनेसचीं ओळख होती, ती भारतातील प्रसिद्ध बिअर आज मार्केटमधून अचानक गायब झाली आहे. कुठेही शोधली तरी ही बिअर सापडत नाही आहे, यामागे नेमकं कारण काय आहे?
2015 मध्ये लाँच करण्यात आलेली ही बिअर. ज्यांनी ही बिअर लाँच केली ते अंकुर जैन कार्नेगी मेलॉन विद्यापीठात शिकले नंतर त्यांनी लंडनमध्ये काही पब चालवले. तिथंच त्यांना भारतीय बिअर बाजारपेठेची क्षमता कळली. भारतात परतल्यावर त्यांना जाणवलं की भारताला स्वतःच्या क्राफ्ट बिअरची गरज आहे. तिथूनच या बिअरचा जन्म झाला.
सुरुवातीला, कंपनीने बिअरची चव आणि गुणवत्ता राखण्यासाठी बेल्जियममधून बिअर आयात केली. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी भारतात स्वतःची ब्रुअरी स्थापन केली. बिअरचा माकडाचा लोगो आणि चव तरुणांमध्ये लोकप्रिय झाली. बऱ्याच लोकांना बिअरची चव आवडत नाही, पण ही बिअर हलकी, चविष्ट आणि मस्त ब्रँडिंग असलेली होती. हे तीन गुण या बिअरचे यूएसपी म्हणजे युनिक सेलिंग प्रपोझिशन होते.
advertisement
बड्या बिअर ब्रँडना टक्कर
2015 साली लाँच झाल्यानंतर काही वर्षांतच ही बिअर भारतातील बिअर उद्योगातील एक नवीन स्टार बनली. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि गोवा यासारख्या ठिकाणी टॅपहाऊसेस उघडण्यास सुरुवात झाली. कंपनीने द बिअर कॅफेसारख्या लोकप्रिय पब चेनसोबत भागीदारी केली.
advertisement
कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात शिखर गाठलं. महसूल 824 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आणि याचं मूल्यांकन 450 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 3700 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं. हे भारतातील भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्राफ्ट बिअर ब्रँड बनलं.
हे सर्व साध्य झाल्यानंतर कंपनीच्या आयपीओबद्दल चर्चा सुरू झाली. असं वाटत होतं की ही बिअर भारतीय बीअर उद्योगाचा राजा बनत आहे. या ब्रँडने अनेक वर्षांपासून भारतीय बिअर बाजारात सर्वाधिक विक्री होणारा ब्रँड किंगफिशरला थेट आव्हान दिलं. ड्रिंकटेक डॉट कॉमच्या मते, 2018 ते 2024 पर्यंत किंगफिशरचा मार्केटमधील भाग 45 ते 50 टक्क्यांच्या दरम्यान होता. त्यानंतर, काही वर्षांत हेवर्ड्स दुसऱ्या क्रमांकावर आणि काही वर्षांत बडवाइजर दुसऱ्या क्रमांकावर होतं. पण त्यांची मार्केटमधील भागीदारी कधीही 20 टक्क्यांपेक्षा जास्त झाली नाही.
advertisement
एक निर्णय आणि गंभीर परिणाम
सर्व काही व्यवस्थित चाललं होतं पण डिसेंबर 2022 मध्ये कंपनीचा पाया हादरवून टाकणारा निर्णय घेण्यात आला. या कंपनीच्या मूळ कंपनीने नाव बदललं. बी9 बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेड बी9 बेव्हरेजेस लिमिटेड करण्यात आलं. आयपीओच्या तयारीसाठी हे पाऊल उचण्यात आलं. पण हेच पाऊल चुकीचं ठरली. हा निर्णय घेण्यापूर्वी संभाव्य संकटाचं मूल्यांकन करण्यात कंपनी अपयशी ठरली.
advertisement
भारतातील अल्कोहोल उद्योग राज्य सरकारच्या नियमांनुसार चालतो. प्रत्येक राज्याचे स्वतःचे परवाना, कर आणि परवाना नियम आहेत. जेव्हा कंपनीने तिचं नाव प्रायव्हेट लिमिटेड वरून लिमिटेड असं बदललं तेव्हा अनेक राज्यांनी सरकारी नियमांच्या अधीन राहून तिला एक नवीन कंपनी म्हणून मान्यता दिली.
advertisement
याचा अर्थ जुने परवाने आणि नोंदणी रद्द करण्यात आली. बिअर विक्रीसाठी नवीन परवाने आणि लेबल्स पुन्हा मंजूर करावे लागले, ही प्रक्रिया 4-6 महिने चालली. या काळात कंपनीची विक्री पूर्णपणे थांबली. दिल्ली-एनसीआर आणि आंध्र प्रदेश सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये या बिअरची विक्री पूर्णपणे थांबली. कंपनीला 80 कोटी रुपयांचा इन्व्हेंटरी राईट ऑफ करावा लागला म्हणजे कंपनीला तोटा म्हणून मोजावा लागला, कारण ही इन्व्हेंटरी विकली गेली नव्हती किंवा विकता येत नव्हती.
advertisement
परवाना समस्येमुळे कंपनीच्या कॅश फ्लोवर गंभीर परिणाम झाला. 2024 आर्थिक वर्षात महसूल 638 कोटी रुपयांपर्यंत घसरला, तर तोटा 748 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. 2025 च्या मध्यापर्यंत परिस्थिती इतकी गंभीर झाली की कंपनीला बिअर उत्पादन थांबवावं लागलं. जुलै 2025 पासून बिअर उत्पादन बंद करण्यात आलं आहे. त्याच वेळी कंपनीने कर्ज फेडल्यामुळे, गुंतवणूकदारांना हस्तांतरित केलेल्या द बीअर कॅफेसह कंपनीने तिच्या काही मालमत्ता गमावल्या.
संकट संपेना
आता कर्मचाऱ्यांचे पगार आणि पीएफ पेमेंटमध्ये उशीर झाल्याचं दिसून येत आहे. पगार, पीएफ आणि टीडीएस पेमेंट 3 ते 6 महिन्यांपासून देण्यात आलेले नाहीत. कंपनीने स्पष्ट संवाद न करता 700 पैकी 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. बाहेरून कंपनीला वस्तू पुरवणाऱ्या पुरवठादारांना त्यांचं पेमेंट वेळेवर मिळालं नाही. कंपनीच्या प्रमुख गुंतवणूकदार ब्लॅकरॉकने 500 कोटी रुपयांचं कर्ज रद्द केलंय ज्यामुळे कंपनीची पैशांची टंचाई आणखी वाढली.
जेव्हा परिस्थिती बिकट झाली तेव्हा कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम निषेध केला. अनेक कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे सीईओ अंकुर जैन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गुंतवणूकदारांनी कंपनीकडून उत्तरंही मागितली. किरिन होल्डिंग्ज (जपान), अनिकट कॅपिटल आणि पीक XV (पूर्वीचे सेक्वोइया कॅपिटल इंडिया) या प्रमुख गुंतवणूकदारांनी कंपनीला फॉरेन्सिक ऑडिट करून लीडरशिप बदलण्याचा सल्ला दिला. दबावाखाली कंपनीने विक्रम कानुंगो यांची नवीन सीएफओ म्हणून नियुक्ती केली.

आता ही बिअर कोणती हे तुम्हाला एव्हाना समजलं असेलच. ही बिअर आहे बिरा 91, जी अंकुर जैन यांनी लाँच केली होती.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 14, 2025 7:01 PM IST


