चंद्राला 'किस', अंतराळात 'संगम'! भारत रचणार इतिहास? ISRO ने सांगितलं 'चांद्रयान-4' काय काय करणार
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
चांद्रयान-3 नंतर इस्रो आता चांद्रयान-4 च्या मोहिमेच्या तयारीला लागलं आहे. या मोहिमेत काय काय करणार याचा संपूर्ण प्लॅन इस्रोनं सांगितला आहे.
नवी दिल्ली : 23 ऑगस्ट 2023 ही तारीख भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. या दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून इतिहास रचला. आता हा आनंद द्विगुणित करण्यासाठी इस्रो एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. चांद्रयान-3 नंतर इस्रो आता चांद्रयान-4 मोहीम यशस्वी करण्यात व्यग्र आहे.
चांद्रयान-4 बाबत इस्रोची योजना काय आहे, याबाबत संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी माहिती दिली आहे. इस्रोचे प्रमुख सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-4 चंद्रावरून नमूने घेऊन पृथ्वीवर परत येईल, अशा पद्धतीने डिझाईन केलं जातं आहे. ते एकाच वेळी लाँच होणार नाही. या अंतराळयानाचे दोन भाग दोन प्रक्षेपकांद्वारे चंद्राच्या कक्षेत पाठवले जातील. चंद्रावर उतरण्यापूर्वी या यानाची अवकाशातच जोडणी होईल.
advertisement
भारत रचणार इतिहास?
इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले, "चांद्रयान-4 चंद्रावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येईल. चांद्रयान-4 एकाच वेळी प्रक्षेपित होणार नाही. त्याऐवजी यानाचे विविध भाग दोन प्रक्षेपणांच्या माध्यमातून चंद्राच्या कक्षेत पाठवले जातील. चंद्रावर उतरण्यापूर्वी हे यान अंतराळातच जोडलं जाईल." असं करण्यामागील कारणही इस्रोच्या प्रमुखांनी सांगितलं. ते म्हणाले की, चांद्रयान-4चं वजन सध्या इस्रोकडे उपलब्ध असलेल्या सर्वात शक्तिशाली रॉकेटची वहन क्षमता ओलांडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे चांद्रयान-4 दोन भागांमध्ये अंतराळात पाठवलं जाईल. एखादं अंतराळयान दोन भागांत प्रक्षेपित करून त्याची अवकाशात जोडणी होण्याची ही जगातील पहिलीच वेळ असेल. अशाप्रकारे चंद्रावर उतरण्यापूर्वीच भारत इतिहास रचणार आहे.
advertisement
इस्रोचे प्रमुख सोमनाथ पुढे असंही म्हणाले की, चांद्रयान-4चं मुख्य काम चंद्रावरील नमुने पृथ्वीवर घेऊन येणं आहे. त्या दृष्टीने चांद्रयान-4 च्या कॉन्फिगरेशनवर काम करण्यात आलं आहे. या मोहिमेत एकापेक्षा जास्त प्रक्षेपकांचा वापर होईल. कारण, सध्याची रॉकेट क्षमता एकाच वेळी यान घेऊन जाण्यासाठी पुरेशी नाही. म्हणून, अंतराळात डॉकिंग क्षमता (स्पेसक्राफ्टचे विविध भाग जोडणे) गरजेची आहे. ती क्षमता विकसित करण्यासाठी सध्या काम सुरू आहे. ही क्षमता प्रदर्शित करण्यासाठी संस्थेने स्पॅडेक्स नावाचं एक मिशन या वर्षाच्या उत्तरार्धात नियोजित आहे.
advertisement
डॉकिंग प्रोसेस म्हणजे काय?
चंद्रावरून परतीच्या प्रवासात स्पेसक्राफ्ट मॉड्युलचं डॉकिंग ही एक नित्याची प्रक्रिया आहे. यामध्ये अंतराळयानाचा एक भाग मुख्य अंतराळयानापासून वेगळा होतो आणि इच्छितस्थळी लँड करतो. त्यावेळी यानाचा दुसरा भाग चंद्राच्या कक्षेत राहतो. जेव्हा लँडिंग केलेला भाग चंद्राच्या पृष्ठभागावरून बाहेर पडतो, तेव्हा तो डॉक करतो आणि चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या यानाच्या भागाशी कनेक्ट होतो. अशा प्रकारे दोन्ही भाग एकत्र होऊन पुन्हा एक युनिट तयार होतं.
advertisement
चांद्रयान-4 चा खरा उद्देश काय आहे?
चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करणं आणि वैज्ञानिक विश्लेषणासाठी पृथ्वीवर परत आणणे, हा चांद्रयान-4 चा खरा उद्देश आहे. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीननेच अशी कामगिरी केली आहे. चांद्रयान-4 ची लँडिंग साईट शिवशक्ती पॉईंट जवळ असेल, असं म्हटलं जात आहे. ज्या ठिकाणी चांद्रयान-3ने यशस्वी लँडिंग केलं होतं त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉईंट नाव देण्यात आलं आहे. चंद्रावरील एक दिवस हा अंदाजे पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. या मिशनचा कालावधी देखील तेवढाच असेल. सुरुवातीच्या 14 दिवसांनंतर चंद्रावर अत्यंत थंड आणि कठोर वातावरण असेल. मल्टी-लाँच आणि मल्टी-मॉड्यूल दृष्टीकोन असलेलं चांद्रयान-4 इस्रोसाठी एक मैलाचा दगड ठरेल. हेवी-लिफ्ट एलव्हीएम-3 आणि विश्वसनीय पीएसएलव्ही रॉकेट मिशनच्या यशासाठी गरजेचे असलेले विविध पेलोड्स वाहून नेतील.
Location :
Delhi
First Published :
June 27, 2024 1:54 PM IST
मराठी बातम्या/Viral/
चंद्राला 'किस', अंतराळात 'संगम'! भारत रचणार इतिहास? ISRO ने सांगितलं 'चांद्रयान-4' काय काय करणार