निळ्या पाण्याची गोष्ट! वीज पडल्याची अफवा अन् Viral Video मागील सत्य
- Published by:News18 Marathi
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
वीज पडल्यानं ओढ्याला निळं पाणी वाहत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. मात्र आता याबाबत धक्कादायक वास्तव पुढं आलं आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव: ओढ्याला अचानक निळं पाणी आल्याचा व्हिडिओ राज्यात प्रचंड व्हायरल झाला. वीज पडल्यानं निळं पाणी वाहत असल्याचा दावा व्हिडिओत करण्यात आला. मात्र आता याबाबत सत्य समोर आलं असून वीज पडल्याची अफवाच असल्याचं स्पष्ट झालंय. धाराशिव जिल्ह्यातील मसला खुर्द येथील हा प्रकार असून याबाबत भूवैज्ञानिक आणि गावातील सरपंचांनी माहिती दिली आहे.
advertisement
वीज पडल्याची अफवाच
तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील ओढ्याच्या पाण्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. यात दिसणारं निळं पाणी हे वीज पडल्यानं आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकाराची सर्वत्र चर्चा झाली. मात्र, याबाबत गावातील सरपंचांनी वास्तव सांगितलं आहे. वीज पडल्याने पाणी निळं झाल्याची अफवा असल्याचं सरपंच रामेश्वर वैद्य यांनी म्हटलंय.
advertisement
निळ्या पाण्याचं वास्तव काय?
ओढ्यातून वाहणारं निळ्या पाण्याची भूवैज्ञानिक विभागाकडून तपासणी करण्यात आली. यातून धक्कादायक सत्य पुढे आले आहे. हे निळं पाणी आजूबाजूला असणाऱ्या द्राक्ष बागांमुळे आल्याचं स्पष्ट झालंय. द्राक्ष बागेत वापरण्यात आलेल्या रासायनिक औषधांमुळे पाण्याला निळा रंग आला आहे. द्राक्षांवर फवारण्यासाठी लागणारी विविध औषधे वापरून राहिलेली फेकून देण्यात आली होती. त्यानंतर पाऊस झाला आणि ती औषध पाण्यात मिसळली गेली. त्यामुळे हे पाणी निळं झालं असल्याचा प्राथमिक अंदाज भू-वैज्ञानिकांकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement
पाणी शरीरासाठी घातक
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची सत्यता पडताळूनच लोकांनी निर्णय घ्यावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. हे पाणी शरीरास घातक असून ते पुढील काही दिवसांमध्ये झिरपून जाईल, असं भूवैज्ञानिक डॉ. मेघा शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ओढ्याला आलेल्या निळ्या पाण्याची संपूर्ण राज्यात चर्चा झाली. परंतु आता याचं गुढ उकललं आहे. हे पाणी फवारणीसाठीच्या औषधांमुळे निळं झालं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वीज पडल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
June 15, 2024 9:48 PM IST