या फोटोची होतेय जगभरात चर्चा! हत्ती सगळ्यांना दिसतोय, तुम्हाला नेमकं काय दिसतंय यात?
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
45 देशांतील छायाचित्रकारांच्या 65 हजार छायाचित्रांमधून बैजू यांनी काढलेला हत्तींचा फोटो अव्वल ठरला आहे. जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यानातील हा फोटो आहे.
छत्रपती संभाजीनगर : फोटो सर्वांनाच काढता येतात. मात्र बघणाऱ्याला फोटोमागची पार्श्वभूमी कळेल, त्यातून काहीतरी संदेश मिळेल, असे क्षण मात्र फार कमी लोकांनाच टिपता येतात. सध्या फोटोग्राफीमध्ये आपल्या भारताचं नाव प्रचंड गाजतंय. मागील 38 वर्षांपासून वन्यजीव छायाचित्रणात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रसिद्ध वाइल्डलाइफ फोटोग्राफर बैजू पाटील यांनी महाराष्ट्रासह देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
इंडोनेशिया क्रोमॅटीक फोटोग्राफी-2024 हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 45 देशांतील छायाचित्रकारांच्या 65 हजार छायाचित्रांमधून बैजू यांनी काढलेला हत्तींचा फोटो अव्वल ठरला आहे. जीम कार्बेट राष्ट्रीय उद्यानातील हा फोटो आहे. हे उद्यान हत्ती आणि वाघांसाठी विशेष प्रसिद्ध असून इथं इतर प्राणीही मोठ्या संख्येनं दिसतात.
बैजू पाटील हे वन्यप्राणी आणि पक्ष्यांचं मुक्त छंदानं जगणं कॅमेऱ्यात कैद करतात. केवळ भारतातच नाही, तर जगभरात विविध ठिकाणी जाऊन बैजू यांनी वाइल्ड लाइफ फोटोग्राफी केली आहे. जीम कार्बेटमध्ये भ्रमंती करत असताना त्यांना हत्तींचा कळप दिसला. त्यांच्या बाजूनं एक मोठा हत्ती गेला, याच हत्तीच्या पायातून त्यांनी समोरील कळपाची फ्रेम टिपली. अतिशय सुरेख, डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा फोटो आहे.
advertisement
हत्तीचा फोटो काढणं अजिबात सोपं नसतं, कारण ते कधीही अग्रेसिव्ह होऊ शकतात. माणसांना सहज ते जवळ येऊ देत नाहीत. मात्र धोका पत्करून बैजू यांनी ही जम्बो फ्रेम कॅप्चर केली. 3-4 वर्षांपूर्वी बैजू यांच्यावर हत्तीने अटॅकही केला होता, या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले होते. आता मात्र त्यांनी काढलेला हत्तीचा फोटो जगप्रसिद्ध झाला आहे. अतिशय जवळ जाऊन काढलेल्या या फोटोला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.
advertisement
दरम्यान, बैजू पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित एमजीएम विद्यापीठात फोटोग्राफी विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी अनेक छायाचित्रकार घडविले आहेत. क्रोमॅटीक फोटोग्राफी स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित केली जाते, मागच्या वर्षी लंडनमध्ये आणि यंदा इंडोनेशियात पार पडली. या स्पर्धेत विजय मिळविण्यासाठी बैजू पाटील मागील 4-5 वर्षांपासून प्रयत्न करत होते, अखेर यावर्षी त्यांना यश मिळालं. तसंच आजवर त्यांना 40हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 24, 2024 3:59 PM IST
मराठी बातम्या/Viral/
या फोटोची होतेय जगभरात चर्चा! हत्ती सगळ्यांना दिसतोय, तुम्हाला नेमकं काय दिसतंय यात?