युवा परिवर्तन संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम, 150 महिलांना दिले गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण, इतक्या रुपयांची होणार बचत
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Pratikesh Patil
Last Updated:
women empowerment - या प्रशिक्षणासाठी गावात ज्यांच्याकडे गायी आणि गुरे, कोंबड्या आहेत अशा महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यांना 3 महिन्यात गांडूळ खत कसे बनवावे तसेच त्याचे फायदे काय आहेत, याचबरोबर गांडूळ खताचा व्यवसाय करून आपण कसे पैसे कमावू शकतो, याचे प्रशिक्षण देण्यात आले.
पालघर - युवा परिवर्तन संस्थेतर्फे वाडा तालुक्यातील शिरसाड, सरोवार आणि डहाळी या 3 गावातील 150 आदिवासी महिला शेतकऱ्यांना गांडूळ खत कसे बनवावे, याचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे प्रत्येकी 3 हजार रुपयांची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रशिक्षणासाठी गावात ज्यांच्याकडे गायी आणि गुरे, कोंबड्या आहेत अशा महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यांना 3 महिन्यात गांडूळ खत कसे बनवावे तसेच त्याचे फायदे काय आहेत, याचबरोबर गांडूळ खताचा व्यवसाय करून आपण कसे पैसे कमावू शकतो, याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण वर्गानंतर महिला गांडूळ खत बनवत आहेत. यात 150 महिलांना कीट देण्यात आले असून यात, 100 किलो क्षमतेचे 3 ड्रम आणि 150 ग्रॅम गांडूळ आहेत. या ड्रममध्ये हे टाकाऊ अन्न, कचरा, पालापाचोळा टाकल्यावर दोन महिन्यांनी गांडूळ खत तयार होईल, असे सांगण्यात आले.
advertisement
महिलांनी दिली ही प्रतिक्रिया -
ज्योती तरे या शिरसाड गावच्या रहिवासी आहेत. आधी त्यांचा मुलगा गांडूळ खत बाजारातून विकत आणायचा. याबाबत त्या म्हणाल्या की, 'या प्रशिक्षण वर्गामुळे मला गांडूळ खत घरी कसे बनवायचे, हे समजले. सध्या आम्ही ड्रममध्ये रोजचा टाकाऊ भाजीपाला, पालापाचोळा टाकत असून 2 महिन्यांनी गांडूळ खत तयार होईल. या गांडूळ खताचा उपयोग आम्ही पिकांसाठी करणार आहोत, अशी माहितीही ज्योती तरे यांनी दिली.
advertisement
3 हजार रुपयांची बचत -
'प्रत्येक शेतकऱ्याला एका वेळेस 2 ते 3 रासायनिक खताच्या बॅगा लागतात, यासाठी साधारण 3 हजार रुपये खर्च होतात. आता या महिला शेतकरी घरच्या घरी गांडूळ खत बनवत असल्याने यांचा खर्च कमी होईल. गांडूळ खत हे नैसर्गिक असून पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. यासाठी आम्ही दुबार, तिबार पीक आणि ज्या महिला शेतकऱ्यांकडे दुभती जनावर आहे, त्यांची निवड केली, अशी माहितीही युवा परिवर्तन संस्थेचे समन्वयक सचिन बारवे यांनी दिली. दरम्यान, मागील 24 वर्षांत, युवा परिवर्तन या संस्थेच्या माध्यमातून 1.25 दशलक्षाहून अधिक वंचित तरुण आणि महिलांना रोजगार देण्याचे काम केले आहे. याच संस्थेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमही राबवले जातात.
Location :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
October 22, 2024 6:12 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
युवा परिवर्तन संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम, 150 महिलांना दिले गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण, इतक्या रुपयांची होणार बचत