ग्राहकांची फसवणूक टळणार, देवगड हापूस आंब्याला मिळणार युनिक कोड, या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनो करा नोंदणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला युनिक कोडचा (UID) देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला आहे.
सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : कोकणातील प्रसिद्ध देवगड आंब्याच्या बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. सर्रासपणे देवगड आंब्याच्या नावाखाली कोणताही आंबा ग्राहकांना दिला जात असल्याचं दिसून येत असल्याने देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा निर्णय घेतला आहे. देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला युनिक कोडचा (UID) देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला आहे.
advertisement
त्यामुळे आता देवगड हापूसच्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. युनिक कोडचे पेटंट मिळालेल्या मुंबई येथील सन सोल्यूशन या कंपनीबरोबर संस्थेने करार केला आहे. त्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बोगस आंबा विक्रीला पायबंद घालण्यात मोठा हातभार लागणार आहे.
advertisement
हे युनिक कोड संस्थेच्या मार्फत वितरित केले जाणार आहेत. अशा युनिक कोडचा बोगस वापर होऊ नये, त्याकरता शेतकऱ्यांना त्यांची देवगड तालुक्यातील आंबा कलमे, 7/12 चा उतारा तपासून आणि त्यांची उत्पादन क्षमता बघून तितकेच कोड मिळणार आहेत. युनिक कोड मुळे देवगड बॉक्सच्या नावावर परजिह्यातील आंबा भरून विक्री करतात आणि ग्राहकांची फसवणूक करतात. यामुळे देवगड हापूस आंब्याचे नाव खराब करतात. युनिक कोडमुळे या सर्व प्रकारावर आळा घालण्यास मदत होणार आहे. कोडमुळे देवगड हापूस आंबा ग्राहकांना लगेच ओळखता येणार आहे.
advertisement
आंब्यावरील हा युनिक कोड ग्राहकांना स्कॅन देखील करता येणार आहे. यामुळे हा आंबा देवगड येथील आहे हे सिद्ध होणार आहे. स्कॅन केल्यानंतर तो आंबा देवगडमधील कोणत्या शेतकऱ्याच्या बागेतील आहे त्याचे नाव देखील समजणार आहे. त्यामुळे देवगड हापूस आंब्याच्या नावावर होणारी परराज्यातील आंब्याची विक्री आणि ग्राहकांची फसवणूक रोखता येणार आहे. 25 जानेवारी 2025 च्या आत शेतकऱ्यांनी संस्थेकडे संपर्क साधून नोंदणी करावी आणि कोडची ऑर्डर नोंदवावी, असे आवाहन देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेने केले आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
January 13, 2025 5:55 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
ग्राहकांची फसवणूक टळणार, देवगड हापूस आंब्याला मिळणार युनिक कोड, या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनो करा नोंदणी