दिल्लीची मदत,पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मेगाप्लॅन

Last Updated:

Cabinet Meeting : राज्यात आलेल्या विक्राळ पुरस्थितीवर आज (३० सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : राज्यात आलेल्या विक्राळ पुरस्थितीवर आज (३० सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यातील सुमारे ६० लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचवली जाणार आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे. तसेच त्यांनी सरकारचा मेगाप्लॅन सांगितला आहे.
पहिल्या टप्प्यात मदतीचे वितरण
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पहिल्या टप्प्यात २ हजार २१५ कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. ही मदत ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीवर आधारित असेल. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून ई-केवायसीची अटही शिथिल करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत सर्व आकडेवारी उपलब्ध होणार असून, पाणी ओसरल्यानंतर अचूक पंचनामे पूर्ण करून मदत वितरित केली जाणार आहे. यात शेतजमीन, घरांचे नुकसान आणि तातडीच्या मदतीचा समावेश असेल.
advertisement
ओला दुष्काळ जाहीर होणार का?
‘ओला दुष्काळ’ ही संज्ञा शासनाच्या नियमावलीत नसली तरी, पूरामुळे निर्माण झालेल्या टंचाईचा विचार करून शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वेळी मिळणारी मदत देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
खरिप हंगामावर मोठा परिणाम
या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील १ कोटी ४६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ६८.७२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने सर्वाधिक हानी केली असून, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेली, पशुधन मृत्यूमुखी पडले आणि घरसंसार उद्ध्वस्त झाला आहे.
advertisement
अन्नधान्य आणि दुधाच्या किमतीत वाढीची शक्यता
या आपत्तीमुळे खरिप क्षेत्राचे जवळपास ४७ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे खरिपाचा हंगाम जवळजवळ संपुष्टात आला आहे. धाराशीव, जालना, बीड, लातूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर भाजीपाला, धान्य आणि अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. तसेच गाई-म्हशींचा मृत्यू, चाराही वाहून जाणे यामुळे दुधाच्या उत्पादनावरही फटका बसणार आहे. यामुळे येत्या काळात दुधासह अन्नधान्याच्या किमतींमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
advertisement
शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न
पूरामुळे ८६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद वृत्तपत्रांनी केली असली तरी शासनाकडून अद्याप अधिकृत आकडेवारी आलेली नाही. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबात कर्ता पुरुष किंवा महिला गमावल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. मुलांचे शालेय साहित्य पाण्यात भिजून निकामी झाले, अनेक शाळा व अंगणवाड्यांची साधनसामग्रीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जगण्याचा तर प्रश्न आहेच, पण मुलांच्या शिक्षणाचाही मोठा पेच निर्माण झाला आहे.
advertisement
राज्य सरकारकडून जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात दिलासा ठरणार असली तरी, येणाऱ्या काळात त्यांचे जीवन पुन्हा रुळावर आणणे हे मोठे आव्हान राहणार आहे.
मराठी बातम्या/कृषी/
दिल्लीची मदत,पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मेगाप्लॅन
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement