शेतीतील कचऱ्यातून शोधला ‘खजिना’ सतीश आता वर्षाला करतोय १ कोटींची कमाई

Last Updated:

Success Story : संकटातून संधी निर्माण होते, असे नेहमी म्हटले जाते. पण काही जण त्या संधीला केवळ यशातच नाही, तर समाजपरिवर्तनात रूपांतरित करतात.

Success Story
Success Story
मुंबई : संकटातून संधी निर्माण होते, असे नेहमी म्हटले जाते. पण काही जण त्या संधीला केवळ यशातच नाही, तर समाजपरिवर्तनात रूपांतरित करतात. झारखंडमधील रांची जिल्ह्यातील चिपरा या छोट्याशा गावातून आलेल्या सतीश महातो यांनी नेमके हेच करून दाखवले आहे. एकेकाळी सायकलवर भाज्यांचे ओझे घेऊन नदी ओलांडत बाजार गाठणारा हा तरुण आज शेतीतील कचऱ्यातून ‘खजिना’ शोधून हजारो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलत आहे.
चार पिढ्यांपासून शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबात वाढलेल्या सतीश महातो यांनी लहानपणापासून शेतकऱ्यांचे हाल जवळून पाहिले. बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची अडचण, उत्पादनाला न मिळणारा योग्य दर आणि पीक काढल्यानंतर उरलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन – या सगळ्या समस्या त्यांच्या मनात खोलवर रुजल्या. या अनुभवातूनच २०१६ मध्ये ‘फीडको अ‍ॅग्रोकार्ट’ या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा उपक्रम केवळ शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देत नाही, तर शेतीतील कचऱ्याला उत्पन्नाचा नवा स्रोत बनवतो.
advertisement
समस्येतून जन्मलेली संधी
किशोरवयात वडिलांसोबत १२ किलोमीटर अंतरावर बाजारात भाज्या नेण्याचा प्रवास करताना सतीश यांना जाणवले की शेतकऱ्यांच्या मेहनतीचा खरा मोबदला त्यांना मिळत नाही. पर्यटन व्यवस्थापनातील पदवी आणि आयआयटीटीएम भुवनेश्वर येथून लॉजिस्टिक्समधील एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी या समस्यांवर उपाय शोधण्याचा निर्धार केला. काही काळ लॉजिस्टिक्स कंपन्यांमध्ये काम करून अनुभव घेतल्यानंतर त्यांनी ‘फीडको अ‍ॅग्रोकार्ट’ची स्थापना केली. या व्यासपीठाच्या माध्यमातून सीमांत शेतकरी, बागायतदार आणि शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) यांना थेट किरकोळ विक्रेते, सुपरमार्केट तसेच लष्कर, रुग्णालये यांसारख्या मोठ्या संस्थांशी जोडले जाते. उत्पादनाची गुणवत्ता, वर्गीकरण आणि योग्य दर यावर भर देत शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळवून दिले जाते.
advertisement
कचऱ्यातून कमाईचा नवा मार्ग
सतीश महातो यांच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पीक अवशेष व्यवस्थापन. दरवर्षी सुमारे १,५०० टन कृषी कचरा गोड कॉर्नचे अवशेष, वाटाण्याचे काड, शेंगदाण्याची पाने, भुसा यांचे मूल्यवर्धन केले जाते. हा कचरा पशुखाद्य, पॅकेजिंग साहित्य आणि औषध उद्योगात वापरला जातो. विशेष म्हणजे या कचऱ्यासाठी शेतकऱ्यांना थेट पैसे दिले जातात. त्यामुळे शेत लवकर साफ होते आणि शेतकऱ्यांना वर्षातून चार पिके घेणे शक्य होते. आतापर्यंत सुमारे ७,००० शेतकऱ्यांना या मॉडेलचा लाभ झाला असून त्यांच्या उत्पन्नात सरासरी ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. अनेक शेतकरी दरमहा सुमारे १८ हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत.
advertisement
आर्थिक यशासोबत सामाजिक बांधिलकी
सतीश महातो यांचा सुमारे ९० टक्के व्यवसाय झारखंडमध्ये असून छत्तीसगड आणि पश्चिम बंगालच्या काही भागातही उपक्रम विस्तारला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीने ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले असून २०२४-२५ मध्ये केवळ पीक अवशेषांमधून मिळणारे उत्पन्न १ कोटी रुपयांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. मात्र, नफा हाच त्यांचा अंतिम उद्देश नाही. कंपनी २०० हून अधिक आदिवासी कुटुंबांच्या उपजीविकेला हातभार लावते आणि किरकोळ वनोपजांच्या व्यापाराला चालना देते. स्थानिकांनाच रोजगार देऊन ग्रामीण भागातून होणारे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न केला जातो. कामगारांना बाजारभावापेक्षा २५ टक्के अधिक वेतन दिले जाते.
advertisement
पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय गौरव
शेती कचरा न जाळल्यामुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे ३० टक्के आणि वायू प्रदूषणात ४० टक्क्यांची घट होत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. सतीश महातो सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत असून आज कंपनीकडून विकल्या जाणाऱ्या सुमारे ५० टक्के उत्पादनांचे स्वरूप सेंद्रिय आहे. त्यांच्या या सामाजिक आणि पर्यावरणीय योगदानाची दखल घेत आयआयएम अहमदाबाद येथील ‘द बुद्ध इन्स्टिट्यूट’कडून त्यांना प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. पुढील काळात एनआरएलएमच्या माध्यमातून राज्य सरकारसोबत काम करून अधिक सूक्ष्म-उद्योजक घडवण्याचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा त्यांचा मानस आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतीतील कचऱ्यातून शोधला ‘खजिना’ सतीश आता वर्षाला करतोय १ कोटींची कमाई
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement