Agriculture News : अतिवृष्टीचा फटका, पण रब्बी बियाण्यांनी दिला दिलासा, शेतकऱ्यांना मिळणार सवलतीत ही बियाणे
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
ज्वारी, गहू आणि हरभरा या रब्बी पिकांसाठी बियाणे अनुदान दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती अक्षरशः पाण्यात गेल्याने त्यांच्यासमोर नव्याने पीक घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ज्वारी, गहू आणि हरभरा या रब्बी पिकांसाठी बियाणे अनुदान दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोफत बियाण्याचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तर अनुदानित दरातील बियाणे हे आधारकार्ड आणि सातबाऱ्याची प्रत सादर करून संबंधित कृषी सेवा केंद्रातून मिळू शकते. या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाया गेले आहे. शासनाकडून त्यांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदतही दिली जात आहे. याशिवाय पुनर्लागवडीसाठी आवश्यक बियाणे सवलतीच्या दरात पुरवले जात आहे.
advertisement
खरीप पिकांच्या नुकसानीनंतर आता रब्बी पेरणीसाठी शेतकऱ्यांना ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकाची बियाणे अनुदानित स्वरूपात वाटप करण्यात येत आहे. जिल्हा कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हरभरा पिकासाठी एकूण 2,509 क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये 10 वर्षांपूर्वी विकसित सुधारित वाणाचे 1,654 क्विंटल बियाणे आणि 10 वर्षांच्या आतील नव्या वाणांचे 855 क्विंटल बियाणे समाविष्ट आहे. प्रतिहेक्टर सुमारे 60 किलो हरभरा बियाण्यांची आवश्यकता असते. जिल्ह्यासाठी सुमारे 900 हेक्टरपर्यंत हरभरा लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
advertisement
तसेच, रब्बी ज्वारी पिकासाठी 510 क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध करण्यात आले असून, त्यामध्ये 10 वर्षांच्या आतील वाणांचे 140 क्विंटल आणि 10 वर्षांवरील संशोधित वाणांचे 370 क्विंटल बियाणे आहे. ज्वारी पेरणीसाठी दर हेक्टरला सुमारे 10 किलो बियाण्यांची गरज भासते.
दरम्यान, गहू पिकासाठी 910 क्विंटल बियाण्यांचा साठा जिल्ह्यासाठी करण्यात आला आहे. गव्हाच्या पेरणीसाठी प्रतिहेक्टर सुमारे 100 किलो बियाणे लागते. शेतकऱ्यांना या बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी संबंधित कृषी सेवा केंद्रात जाऊन आधारकार्ड आणि सातबाऱ्याची प्रत दाखवून अनुदानित दरात बियाणे मिळू शकते.
advertisement
वेळेत येणाऱ्या शेतकऱ्यांना पहिली संधी मिळणार
view commentsअनुदानित दरानुसार, ज्वारी बियाण्याची 4 किलोची बॅग शेतकऱ्यांना 220 रुपये ते 252 रुपये दरम्यान उपलब्ध आहे. तर गव्हाचे बियाणे दोन वजनात 20 किलो व 40 किलोच्या बॅगमध्ये विक्रीस असून, त्यांचे अनुक्रमे दर 700 रुपये आणि 1400 रुपये ठेवण्यात आले आहेत. हरभऱ्याचे बियाणे देखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असून, 10 किलोची बॅग 630 रुपयांना आणि 20 किलोची बॅग 1260 रुपयांना मिळत आहे. सर्व बियाणे मर्यादित प्रमाणात असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर वितरण केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Location :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
November 03, 2025 11:02 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : अतिवृष्टीचा फटका, पण रब्बी बियाण्यांनी दिला दिलासा, शेतकऱ्यांना मिळणार सवलतीत ही बियाणे


