श्रावणाची चाहूल, फूल बाजारातून मोठं अपडेट, झेंडू, शेवंतीसह ही फुले महागणार!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Flower Rate: श्रावण महिन्याची चाहुल लागताच फूल बाजारात हालचाल जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसांत फुलांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे: आषाढ महिना संपून आता व्रत-वैकल्यांच्या श्रावणाचे वेध लागले आहेत. श्रावण महिन्याची सुरुवात होताच सण आणि उत्सवांची रेलचेल सुरू होते. पहिला श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन या सणांसाठी आतापासूनच बाजार सजू लागले आहेत. या काळात देवाची पूजा, घरसजावट आणि इतर कारणांसाठी फुलांना देखील मोठी मागणी असते. त्यामुळे फुलांच्या बाजारात देखील मोठ्या हालचाली जाणवण्याची चिन्हे आहेत.
श्रावण महिन्यात वेगवेगळ्या फुलांना मोठी मागणी असते. झेंडू, गुलाब, शेवंती ही फुले तर तेजीत असतात. त्यामुळे फूलबाजारात मोठी उलाढाल होत असते. या काळात सर्वच फुलांच्या दरात 30 ते 40 टक्क्यांनी दरवाढ होते, असे पुण्यातील फूल व्यापारी शशिकांत सुकरे यांनी सांगितलं.
advertisement
सध्या फुलांचे दर
सध्या फूल बाजारात झेंडू 80 ते 100 रुपये प्रति किलो, गुलाब 150 ते 200 रुपये एक बुके, मोगरा 500 ते 600 प्रति किलो, रजनीगंधा 200 ते 300 प्रति किलो आणि चाफा, शेवंती 140 ते 180 रुपये प्रतिकिलो या दराने विकले जातात.
फुलांच्या दरात वाढ होणार
श्रावण महिना म्हणजे भक्ती, सजावट आणि उत्सवांचा महिना आहे. या महिन्यात केवळ पूजाच नाही, तर अनेक ठिकाणी व्रत-वैकल्ये, गोडधोड, हळदीकुंकू अशा परंपरा असतात. या सगळ्यामध्ये फुलं नेहमीच महत्त्वाची असतात. देवाच्या पूजेसाठी वापरली जाणारी फुलं श्रद्धेचं प्रतीक मानली जातात. त्यामुळे येत्या 25 जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात फुलांचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 22, 2025 11:12 AM IST